हुक्केरी ग्रामीण विद्युत संघाच्या निवडणुकीत पाठिंबा मिळेल : जारकीहोळी
बेळगाव : हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्थेमार्फत स्थानिक नागरिकांना योग्य सुविधा मिळत नाहीत. एक टीसी (ट्रान्स्फॉर्मर) देण्यासाठी सहा महिने घेत होते. आता आमच्या नेतृत्त्वात गेल्या तीन महिन्याच्या काळात स्थानिक शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत टीसी मिळवून देत आहोत. त्यामुळे या संघाच्या निवडणुकीत जनतेकडून अप्पाण्णगौडा पाटील पॅनेलला भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वास मंत्री जारकीहोळी यांनी केला. कमतनूर (ता. हुक्केरी) येथे बुधवारी माध्यमांसमोर ते बोलत होते. हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाची निवडणूक आम्ही प्रतिष्ठेची मानलेली नाही. याबद्दल आपण यापूर्वीच सांगितले आहे.आमच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आमची घेतलेली काळजी आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही घेत आहोत. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (बीडीसीसी) उभारणी लिंगायत समुदायाने केली यात दुमतच नाही. मात्र याच समुदायाकडून बँक व अन्य सहकारी संस्थांची गळचेपी होत असल्याने त्यांच्या उद्धारासाठी आम्ही परिश्रम घेत आहोत, असे ते म्हणाले.
बीडीसीसीच्या निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळेल. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड भालचंद्र जारकीहोळी, आण्णासाहेब जोल्ले आदींना विश्वासात घेऊन करणार आहोत. कोणत्याही निवडणुकीत आम्ही कोणाच्याही वैयक्तिक विषयावर विधान करीत नाही. निवडणुकीत राजकीयदृष्ट्या आरोप होणे स्वाभाविकच आहे. मात्र खोटी भाषणे केल्यास त्यावर कोणीच विश्वास ठेवणार आही. विकासकामे कोणी केली हे जनता पाहत असते. रमेश कत्ती यांनी राजकीयदृष्ट्या लिंगायत समाजाच्या विरोधात अनेक निवडणुका लढविल्या आहेत. त्यांना गोकाक, अरभावीला जाण्यासाठी आम्ही अडवणूक केलेली नाही. रमेश कत्ती हे आमच्यापेक्षा अगोदरच सत्तेवर आले होते. हुक्केरी, यमकनमर्डी मतदारसंघात रस्त्यांची पाहणी केल्यास कोण किती विकासकामे केली हे समजून येईल, असेही मंत्री जारकीहोळी म्हणाले. यावेळी कमतनूर ग्रामस्थांच्यावतीने मंत्री सतीश जारकीहोळी व राहुल जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला.