शहापूर परिसरात दौडला उदंड प्रतिसाद
अवतरली शिवशाही, तरुणाईचा अभूतपूर्व उत्साह : भगवे ध्वज, रांगोळ्यांनी सजले मार्ग : सर्वत्र चैतन्यमय वातावरण
बेळगाव : जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, देशासाठी झुंजायचं रं, दुर्गामाता की जय, अशा घोषणा, शिवप्रेमींचा सळसळून वाहणारा उत्साह अशा भगवेमय वातावरणात रविवारी शहापूर परिसरात दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली. चौथ्या दिवशीच्या दौड मार्गावर धारकरी आणि शिवभक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्याबरोबर भगवे ध्वज, रांगोळ्यांनी सजलेल्या मार्गावर सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शहापुरात शिवशाही अवतरली होती.
शहापूरमधील विविध गल्लोगल्ली दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी शिवरायांचे मूर्ती ठेवून पुष्पवृष्टी करण्यात आली. महिलांनीही जागोजागी औक्षण करून ध्वजाचे पूजन केले. नाथ पै सर्कल येथील अंबाबाई देवस्थानापासून आरती व शस्त्रपूजन करून दौडला चालना देण्यात आली. शहापूर सोमवंशीय क्षत्रिय समाज पंच कमिटी व नगरसेवक रवी साळुंखे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. घटस्थापनेपासून शहराच्या विविध भागात दुर्गामाता दौड मार्गस्थ होऊ लागली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने शहापूर परिसरात निघालेल्या दुर्गामाता दौडलाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अबालवृद्धांसह युवक, युवतींचाही मोठा सहभाग होता. पांढरे वस्त्र, पांढऱ्या टोप्या आणि शिवरायांच्या प्रेरणादायी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
नाथ पै सर्कल येथील अंबाबाई देवस्थानपासून दौडला प्रारंभ करण्यात आला. लक्ष्मी रोड, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरीनगर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उपार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, संभाजी रोड, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठलदेव गल्ली, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसूर बसवाण गल्ली, बोळमाळ बोळ, खडेबाजार, महात्मा फुले रोड, मीरापूर गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, एम. एफ. रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, खडेबाजार गल्ली, मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल येथून गोवावेस येथे सांगता करण्यात आली.
तरुणाईचा उत्साह
चौथ्या दिवशीच्या दुर्गामाता दौडमध्ये तरुणाईचा सळसळता उत्साह लक्ष वेधून घेत होता. दौडमध्ये शिवरायांच्या जयघोषाने वातावरण चैतन्यमय होते. तरुणाईची शिस्त लक्ष वेधून घेत होती. युवक आणि युवतींच्या सहभागाने दौड वैशिष्ट्यापूर्ण ठरली.
दौडमध्ये सहभागी झालेल्या बैलगाडीचे आकर्षण
शहापूर परिसरात रविवारी मार्गस्थ झालेल्या दौडमध्ये बैलगाडीचा सहभाग सर्वांसाठी आकर्षण ठरला. बैलांना अंगावर घातलेले झूल, डोक्यावर मोरपीस आणि सजविण्यात आलेल्या बैलगाडीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे चौथ्या दिवशीची दौड अविस्मरणीय ठरली.
जिवंत देखाव्यांचे सादरीकरण
दौडमार्गावर महिलांनी जिवंत देखावे सादर केले. बलात्कारासारख्या वाईट प्रवृत्तींना कडक शासन व्हावे, व्यसनापासून दूर होऊन देशासाठी आणि धर्मासाठी कार्य करावे, यासारखे सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले. बसवेश्वर सर्कल येथे आरती आणि ध्येयमंत्र म्हणून चौथ्या दिवसाच्या दौडची सांगता झाली. बाळकृष्ण (बाळूमामा) जगन्नाथ काजोळकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
उद्याचा दौडचा मार्ग...
श्री दुर्गामाता मंदिर बसवेश्वर सर्कल, खासबाग येथून दौडला प्रारंभ होणार आहे. भारतनगर पहिला क्रॉस, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगम्मा मंदिर रोड, भारतनगर पाचवा व चौथा क्रॉस, रयत गल्ली, ढोर वाडा, सपार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेन रोड, बाजार गल्ली, मारुती मंदिर, तेंगीन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेशपेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर, बस्ती गल्ली, खन्नूरकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प क्रॉस नं. 3, हरिजन वाडा, हरि मंदिर, विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, संभाजीनगर, पाटील गल्ली येथून मंगाई मंदिरात सांगता होणार आहे.