For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतात उत्पादनवाढीस प्रचंड संधी

06:47 AM Mar 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतात उत्पादनवाढीस प्रचंड संधी
Advertisement

परिस्थितीचा लाभ उद्योजकांनी घ्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेबीनारमध्ये आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जगाच्या आर्थिक वातावरणात झपाट्याने परिवर्तन होत असून भारतीय उत्पादकांना जगाच्या पुरवठा साखळ्यांमध्ये महत्वाची भूमिका साकारण्याची मोठी संधी आज उपलब्ध झाली आहे. त्यांनी या अनुकूल वातावरणाचा लाभ उठवावा आणि आपल्या उत्पादनामध्ये मोठी वाढ करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते मंगळवारी लघु उद्योग आणि मध्यम उद्योगासंबंधीच्या एका अर्थसंकल्पोत्तर वेबीनारमध्ये भाषण करीत होते. भारतीय उद्योगक्षेत्राने तंत्रज्ञान विकासावर भर देऊन प्रगती साधावी, अशीही सूचना त्यांनी भाषणात केली. भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन बनण्याच्या परिस्थितीत आहे. केंद्र सरकारने उद्योग क्षेत्राला स्थिर आणि विकासानुकूल धोरण दिले आहे. कल्पक उत्पादनांना जगाच्या बाजारात आज मोठी मागणी आहे. त्यामुळे भारतीय उद्योजकांना या परिस्थितीचा लाभ उठविण्यात मागे पडता कामा नये. त्यांनी संशोधन आणि तंत्रज्ञान विकासावर मोठा भर देण्याची आवश्यकता आहे. वेगाने प्रयत्न केल्यास यात निश्चित यश मिळू शकते. तेव्हा आता सकारात्मक पद्धतीने आणि आक्रमकपणे या संधीचा लाभ भारतीय उद्योजकांनी घ्यावा. यामुळे देशाचा मोठा विकास साधला जाईल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Advertisement

विश्वासू भागीदाराची आवश्यकता

आज जगाला एका विश्वासू भागीदाराची आवश्यकता आहे. या स्थितीत भारतीय उद्योग क्षेत्राने केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये. जगाची आवश्यकता भागविण्याची कल्पकता आणि प्राप्त संधीचा लाभ उठविण्याची क्षमता त्याने दाखवावी. काही वर्षांपूर्वी जगावर आलेल्या कठीण काळातही टिकाव धरण्याची क्षमता आपल्याकडे आहे, हे भारताने सिद्ध केले आहे. त्याच पायावर आज मोठी भरारी मारण्याची ही संधी हातची गमावू नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.

व्यवसाय सुलभता धोरण

देशात अधिकाधिक प्रमाणात व्यवसाय सुलभ वातावरण (एस ऑफ डुईंग बिझनेस) निर्माण करण्यास केंद्र सरकार बांधील आहे. तसेच उद्योगांना भांडवल पुरविण्याच्या नव्या सोप्या आणि सुलभ पद्धतींचाही विकास केला जात आहे. उत्पादनसंबंधित सवलतीही दिल्या जात आहेत. अशी योजना 14 उद्योगक्षेत्रांसाठी लागू करण्यात आली आहे. विदेशी गुंतवणूक अधिकाधिक प्रमाणात यावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून राज्यांची भूमिकाही या संदर्भात अत्यंत महत्वाची आहे. जी राज्ये प्रागतिक आर्थिक धोरणे स्वीकारतील, त्या राज्यांमध्ये विदेशी गुंतवणुकीचा ओढा अधिक प्रमाणात राहील. केंद्र सरकारच्या विविध उद्योगानुकूल योजनांमुळे 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेली असून 13 लाख कोटी रुपयांचे उत्पादन झालेले आहे, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

अर्थसंकल्प गेम चेंजर

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प उत्पादनवाढीच्या संदर्भात गेम चेंजर ठरला आहे. या अर्थसंकल्पात लोकांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त लाभ देणाऱ्या तरतुदी आहेत. या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासासाठी भक्कम पाया निर्माण केला असून त्याचा लाभ उद्योजकांनी घ्यावा. नवे संशोधन आणि तंत्रज्ञान विकास या क्षेत्रात वेगाने काम केल्यास आर्थिक चित्र सुधारण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे उद्योजकांनी ही संधी घ्यावी, असे कळकळीच आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

अडथळे केले दूर

केंद सरकार आणि विविध राज्य सरकारे यांनी उद्योगांची स्थापना आणि संचालन सुलभरित्या करता यावे, यासाठी 40,000 हजारांहून अधिक अटी (कंप्लायन्सेस) रद्द केले आहेत. असे देशाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. यामुळे आज कधी नव्हे इतके उद्योगस्नेही वातावरण देशात निर्माण झाले आहे. आता केवळ उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात या वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केले.

जागतिक स्थितीचा लाभ घ्या...

ड कल्पक उत्पादनांना आज जगात सर्वत्र आहे मोठी मागणी, बाजारपेठ

ड उद्योजकांनी संशोधनावर आधारित कल्पक उत्पादने बाजारात आणावीत

ड केंद्र सरकारने उद्योगसुलभ वातावरण निर्मितीसाठी केले आहेत प्रयत्न

ड भारतीय उद्योजकांनी जगाच्या पुरवठा साखळ्यांचा महत्वाचा भाग बनावे

Advertisement
Tags :

.