राज्यात पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ
2025 सालात 1.08 कोटी पर्यटक : 1.2 कोटी देशी तर 5.17 लाख विदेशी
प्रतिनिधी/ पणजी
भारतातील आघाडीच्या पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून गोव्याचे नाव घेतले जाते. कोराना महामारीवेळी कमी झालेल्या पर्यटकांच्या संख्येत सध्या लक्षणीय वाढ झालेली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 2025 वर्षामध्ये गोव्यात एकूण 1 कोटी 08 लाख 02 हजार 410 पर्यटक आल्याची नोंद झाली आहे. त्यात 1 कोटी 02 लाख 84 हजार 608 देशी तर 5 लाख 17 हजार 802 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे, 2017 मध्ये एकूण 77 लाख 85 हजार पर्यटक आले होते तर 2024 मध्ये 1 कोटी 4 लाख इतके पर्यटक आले. चार्टर विमानाद्वारे येणाऱ्या विदेशी पर्यटनाचे यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. 2017 मध्ये राज्यात 2 लाख 49 हजार 374 पर्यटकांसह 1 हजार 24 चार्टर विमाने गोव्यात आली, तर 2019 मध्ये 799 चार्टर विमाने गोव्यात आली.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) सुऊ झाल्यानंतर, 2023-2025 मध्ये दाबोळी आणि मोपा विमानतळांवर मोठ्या संख्येने चार्टर विमाने उतरल्याची नोंद झाली आहे. 2025 मध्ये दाबोळी विमानतळावर 643 आणि मोपा विमानतळावर 1 हजार 141 विमाने उतरली असून त्यात 2 लाख 35 हजार 798 विदेशी पर्यटक आले होते. क्रूझ पर्यटनाच्या माध्यमातून 2025 मध्ये 37 क्रूझ जहाजांनी 51 हजार 510 पर्यटक (10 हजार 086 विदेशी, 41 हजार 424 देशी) आले.
गोव्यातील पर्यटन क्षेत्रात झालेली सुधारणा पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते. देशांतर्गत, चार्टर, आंतरराष्ट्रीय उ•ाणे आणि क्रूझ विभागांमधील वाढ, तसेच मोपा विमानतळाद्वारे वाढलेली वर्दळ, गोव्यात येण्यासाठी एक सुलभ साधन असल्याचे अधोरेखित करते, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. आमचे लक्ष दर्जेदार पर्यटनाला प्रोत्साहन देणे तसेच बाजारपेठांमध्ये विविधता आणणे आणि स्थानिक व्यावसायिकांना पर्यावरणाला आणि अर्थव्यवस्थेला फायदा व्हावा यासाठी पर्यटनाला चालना देणे हेच आहे, असेही त्यांनी सांगितले.