कर्ले शिवारात गवी रेड्यांचा धुमाकूळ
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, वनखात्याचे साफ दुर्लक्ष झाल्याने संताप
वार्ताहर/किणये
कर्ले शिवारात गेल्या महिन्याभरापासून गवी रेड्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गवी रेड्यांचा बंदोबस्त करण्याकडे वनखात्याचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गाकडून होत आहेत. या गवी रेड्यांचा बंदोबस्त करा किंवा त्यांना डोंगर परिसरात हुसकावून लाव, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी डेंगर पायथ्याशी अधिक प्रमाणात आहेत. या शेतजमिनीमध्ये शेतकऱ्यांनी जेंधळा, मका, ऊस, बिन्स व इतर भाजीपाला पिके घेतलेली आहेत. मात्र गवी रेड्यांचा कळप या शिवारात शिरुन पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे आता शेती कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जोंधळा, मका व भाजीपाला पिकाच्या उत्पादनासाठी बियाणे, खत, लागवड आदीसाठी वारेमाप खर्च केला आहे. हे पीक बहरुन येण्याच्या कालावधीतच गवी रेड्यांचा कळप शिवारात घुसून पिके फस्त करू लागला आहे. त्यामुळे पिकांसाठी केलेला खर्च निघणार कसा, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
धनमाळ शिवारात गव्यांचा कळप
मंगळवारी सकाळी 8.30 ते 9 च्या दरम्यान कर्ले गावापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर असलेल्या धनमाळ शिवारात गव्यांचा कळप जाताना दिसला. काजूच्या बागेत मुक्तपणे या गव्यांचा मुक्तपणे संचार सुरू होता. या वेळी काजू जमा करण्यासाठी गेलेले शेतकरी गव्यांच्या कळपाला पाहून घाबरत घराकडे आले. गवी रेड्यांच्या कळपात सुमारे 12 ते 15 गवी रेडे असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. महिन्याभरापासून रात्रीच्यावेळी शेत शिवारात गवी रेडे फिरत आहेत. शेतातील भाजीपाला व अन्य पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काजू बागायतींमध्ये गव्यांचा थेट प्रवेश
मंगळवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या आमच्या काजूबागेत गव्यांचा कळप दिसला. हे गवी रेडे इतके मोठे होते की, त्यांना बघून आम्ही भयभीत झालो आणि बागेतील काजू वेचण्याचे काम अर्धवट सोडून घरी परतलो. सध्या काजू हंगाम जोमाने सुरू आहे. यामुळे धनमाळ शिवारात काजू बागांमध्ये महिला काजू वेचण्यासाठी जात आहेत. गव्यांचा वावर वाढला असल्यामुळे महिला वर्गांमध्येही अधिक भीती निर्माण झाली आहे. या गवी रेड्यांच्या कळपाने या परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून सदर गवी रेड्यांचा बंदोबस्त करावा.
- मुपुंद डुकरे, शेतकरी
