श्री देव बोडगेश्वर दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी
8 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम : जायंट व्हील नसल्याने जत्रोत्सवाच्या फेरीत मरगळ
म्हापसा : भक्तांच्या हाकेला पावणारा म्हणून प्रसिद्ध असलेला म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाला काल शुक्रवारी 2 जानेवारी रोजी प्रारंभ झाला. सकाळी 7 वा. पासून भाविकांनी श्रीच्या दर्शनास अलोट गर्दी केली होती. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत यंदा पहिल्याच दिवशी विक्रमी संख्येने भक्तगणांनी श्रीचे दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गावकऱ्यांनी गाऱ्हाणे घालून प्रसाद दिला. दुपारी 12 वा. पुरोहित व नंतर स्थानिक गावकर मंडळी पारंपरिक गाऱ्हाणे घालून देव बोडगेश्वराच्या 91 व्या महान जत्रोत्सवास सुऊवात करण्यात आली. दुपारी महाप्रसाद
होऊन सायंकाळी 5.30 वा. स्वर भगिनी प्रस्तुत अभंग, भावगीत व नाट्यागीतांचा कार्यक्रम झाला. रात्री 12 वा. दशावतारी नाटक ‘मायाजाल’ सादर करण्यात आले. श्री देव बोडगेश्वराकडे नवस करून भाविक साकडे घालतात. काम झाल्यावर नवस फेडण्यासाठी येतात. जत्रोत्सवाच्या फेरीला कपड्यांची, भांड्यांची तसेच खाद्यपदार्थांची, लहान मुलांची खेळणी, विविध रंगीबेरंगी चित्रे, चपला, लाकडी विविध उपकरणे, फुगे यांची दुकाने थाटलेली आहेत. राज्यातील विविध ठिकाणाच्या प्रसिद्ध व्यापाऱ्यांनी आपली लाडू, खाज्याची दुकाने थाटली आहेत. सध्या थंडीचे दिवस असल्याने ब्लेंकेट, रग, चादर, स्वेटर, शाल विक्रेते इतर राज्यातून मोठ्या संख्येने आलेले आहेत.
जत्रोत्सवाच्या फेरीला मरगळ
दरवर्षी म्हापसा येथे असलेल्या प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाला जायंट व्हील नसल्याने संपूर्ण जत्रोत्सवाच्या फेरीत मरगळ आल्याचे पहायला मिळाले. आवश्यक ना हरकत दाखले नसल्याने दोन्ही जायंट व्हील सीलबंद करण्यात आली आहेत.
अनेकांनी घेतले दर्शन
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारीवर्ग आदी भक्तगणांनी येथे उपस्थित राहून श्रीचे दर्शन घेतले. म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा श्री देव बोडगेश्वरचा 33 वा वर्धापनदिन व 91 वा महान जत्रोत्सव शुक्रवार दि. 2 जानेवारी पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमानिशी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.
यानिमित्त आज शनिवार दि. 3 रोजी सकाळी 10 वा. देवस्थानतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दु. 1 वा. महाप्रसाद, सायं. 5.30 वा. भजन, 7.30 वा. ‘फुलले रे क्षण माझे’ हा मराठी भावगीत, भक्तीगीत, चित्रपटगीत, नाट्यागीत, यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 4 रोजी सकाळी 10 वा. पिकअप -ड्रायव्हर असोसिएशन म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दु. महाप्रसाद, सायं. 5.30 वा. संगीत संध्या हा सुगम संगीताचा कार्यक्रम, सायं. 7.30 वा. स्वर धारा हा भावगीत, युगुल गीतांचा, नाट्यागीत कार्यक्रम होईल.