बिळकी-अवरोळी रुद्रस्वामी मठावरील यात्रोत्सवाला मोठी गर्दी
भरपावसातही भाविकांचा अमाप उत्साह : पालखी-रथोत्सव
वार्ताहर/नंदगड
बिळकी-आवरोळी येथील रुद्रस्वामी मठावर सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी रुद्रस्वामी देवाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दिवसभर दमदार पाऊस असूनही यात्रोत्सवातील रथोत्सवाला मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. यात्रेनिमित्त रुद्रस्वामी मठावर सकाळी ध्वजारोहण झाले. त्यानंतर रुद्रहोम, महारुद्राभिषेक, मंगलआरती, पालखीत देवाची मूर्ती ठेवून वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली.
दुपारी 4 वाजता मठाधीश चन्नबसवदेवरू यांच्या मार्गदर्शनाखाली रथोत्सव झाला. रथ ओढण्यासाठी भरपावसातही भाविकांत मोठा उत्साह दिसून येत होता. दुचाकी, चारचाकी घेऊन सकाळपासूनच भाविक दाखल होत होते. परिसरातील भाविक गटागटाने चालत मठाकडे येत होते. दुपारी बारानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाविकांनी गर्दी केली होती. शाळांना सुटी राहिल्याने शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.