For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किरण भगतकडून हुडा चारीमुंड्या चीत

09:30 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
किरण भगतकडून हुडा चारीमुंड्या चीत
Advertisement

युवराज पाटील / उमेश मजुकर /सांबरा

Advertisement

मुतगा येथे श्री हनुमान कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थ मुतगे यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान यात्रेनिमित्त गावसुधारणा मंडळ देवस्थान कमिटी व ग्रामपंचायत यांच्यावतीने भव्य कुस्ती मैदानात प्रमुख कुस्तीत महाराष्ट्राचा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने आंतरराष्ट्रीय पदक विजेता आशिष हुडाचा 22 व्या मिनिटाला मानेवर व हातावर एकेरी कस चढवून सिंगल नेलसन डावावर चारीमुंड्या चीत करीत उपस्थित 25 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व जागतिक पदक विजेता आशिष हुडा ही कुस्ती हनुमान कुस्ती संघटना, गावसुधारणा मंडळ, देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला किरण भगतने एकेरी पट काढून सवारी भरण्याचा प्रयत्न केला. 2 मिनिटानंतर कस काढून पुन्हा सवारीवरती चीत करण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी आशिष हुडाने त्यातून सुटका करुन घेतली. 9 व्या मिनिटाला आशिष हुडाने खालून डंकी मारुन किरण भगतवर ताबा मिळविला. व मानेचा कस काढीत घिस्स्यावरती भिरविण्याचा प्रयत्न केला. पण बलदंड शरीराच्या किरण भगतला फिरवणे कठिण गेले. त्यातून किरण भगतने सुटका करुन घेतली. 18 व्या मिनिटाला किरण भगतने एकेरी कस काढत आशिष हुडाला खाली घेत एकलांगी भरण्याचा प्रयत्न केला. पण आशिषने एकलांगीतून सुटका करुन घेतली. किरण भगतने मानेवरती कस काढीत सवारी भरली. त्यातून खालून डंकी मारुन वरती येण्याचा प्रयत्न केला. 24 व्या मिनिटाला किरण भगतने मानेवरती व हातावरती एकेरी कस लावून सिंगल नेसलन डावावरती नेत्रदीपक विजय मिळवत उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली. कुस्तीनंतर भावकाण्णा पाटील यांच्या हस्ते मुतगा केसरी किताब व चांदीची गदा देऊन किरण भगतचा गौरव करण्यात आला.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व अनुजकुमार हरियाणा ही कुस्ती मुतगा ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान कमिटीच्या हस्ते लावण्यात आली. 2 ऱ्या मिनिटाला अनुजकुमार हरियाणाने एकेरी पट काढीत कार्तिक काटेला खाली घेत कब्जा मिळविला. कार्तिक काटेला घिस्स्यावरती फिरविण्याचा प्रयत्न करीत असताना कार्तिकने एकलांगी भरण्याचा प्रयत्न केला. अनुजने एकलांगी सोडून घेऊन मानेवर घुटना डावाची पकड मिळविली. पण खालून डंकी मारण्याचा प्रयत्न कार्तिक काटेने सतत चालू ठेवला. 9 व्या मिनिटाला कार्तिक काटेने खालून डंकी मारत अनुजवर कब्जा मिळवित एकलांगी भरण्याचा प्रयत्न केला. पण अनुजकुमारने आपल्या ताकदीच्या जोरावर त्यातून सुटका करुन घेतली. 13 व्या मिनिटाला पुन्हा अनुजकुमारने एकेरी पट काढून कार्तिक काटेला खाली घेत घुटण्याची मजबूत पकड धरुन घुटण्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच कार्तिकने डंकी मारत वरती येत 14 व्या मिनिटाला एकलांगी भरण्याचा प्रयत्न करत उलटी डावावरती चीत करुन आपली विजयी घौडदोड कायम राखीत प्रेक्षकांच्याकडून वाह वाह मिळविली.

Advertisement

तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व बाळू अपराध ही कुस्ती निवृत्त जवान संघटनेच्यावतीने लावण्यात आली. या कुस्तीत चौथ्या मिनिटाला बाळू अपराधने एकेरी पट काढत संगमेशला खाली घेऊन घुटण्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. ही कुस्ती डावप्रतीडावाने झुंजली. शेवटी वेळेअभावी पंचांनी गुणावरती निकाल करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बाळू अपराधने एकेरी पट काढून संगमेश बिराजदारला खाली घेत गुण मिळवित विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाची कुस्ती कार्तिक कार्वे व करण हरियाणा ही कुस्ती डावप्रतीडावाने झुंजली पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत संजू इंगळगीने विक्रम शिनोळीचा एकेरी कस चढवत एकलांगी डावावरती विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत कामेश कंग्राळीने ऋषिकेश देवकाते सांगलीचा घुटना डावावरती पराभव केला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रेम कंग्राळीने रुपेश रुपनर सांगलीचा मोळी डावावरती पराभव केला.

आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत कार्तिक इंगळगीने गुत्याप्पा इंगळगीचा गुणावर पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत कडोली मैदाना जखमी झाल्यामुळे पृथ्वी कंग्राळी न आल्यामुळे गौस कुंदरगीला विजयी घोषित करण्यात आले. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत महेश तिर्थकुंडयेने हनमंत गंदीगवाडला छडीटांग डावावरती पराभूत केले. दयानंद शिरगावने विक्रम तुर्कीवाडीचा एकचाक डावावरती, प्रविण निलजीने राकेश सांगलीचा घिस्स्यावर, विनायक येळ्ळूरने अमर बंबरगाचा घुटण्यावर, भरत मुतगेने चेतन येळ्ळूरचा एकलांगीवर, भूमीपूत्र मुतगाने राहुल किणयेचा एकलांगीवर श्रीकांत शिंदोळीने रोहित माचीगडचा घिस्स्यावरती पराभव केला. त्याशिवाय केशव मुतगा, नितीन मुतगा, आर्यन मुतगा, करण खादरवाडी, निखिल निट्टूर, श्री घाडी, केशव सांबरा यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला. प्रारंभी गावसुधारणा मंडळाच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. निवृत्त जवान संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. आखाड्याचे पंच नवीन मुतगा, बाबू कलेहोळ, प्रकाश तिर्थकुंडये, सुधीर बिर्जे, चेतन बुद्धण्णावर, हनमंत पाटील, नामदेव पाटील, विलास पाटील, भावकाण्णा पाटील, कृष्णा शिंदोळकर, श्रीकांत पाटील, शंकर पाटील, संजय चौगुले यांनी काम पाहिले. राशिवडेचे कृष्णकांत चौगुले यांनी आपल्या समालोचनावर कुस्तीचा आढावा घेतला. तर यळगुडच्या ओमकार दाभाडेने आपल्या रणालगीच्या तालावर सर्व कुस्तीशौकिनांना खिळवून ठेवले.

Advertisement
Tags :

.