हुबळी-पुणे वंदे भारतची आज चाचणी
बेळगाव : हुबळी-पुणे वंदे भारतची चाचणी गुरुवार दि. 12 रोजी होणार आहे. हुबळी-मिरज-हुबळी या मार्गावर वंदे भारत चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे नैऋत्य रेल्वेने तयारी सुरू केली असून रविवार दि. 15 रोजी हुबळी-पुणे मार्गावर वंदे भारत धावणार हे निश्चित झाले आहे. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता हुबळी रेल्वे स्थानकातून वंदे भारत सुटणार असून दुपारी 12.20 वाजता बेळगावला तर दुपारी 3 वाजता मिरजला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात दुपारी 3.30 वाजता मिरज येथून निघालेली एक्स्प्रेस सायंकाळी 5.30 वाजता बेळगावला तर रात्री 7.50 वाजता हुबळीला पोहोचेल.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करणार आहेत. हुबळी रेल्वे स्थानकात केशरी रंगातील नवीन वंदे भारत दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये वंदे भारतबाबत प्रचंड उत्सुकता आहे. गुरुवारी केवळ चाचणी होणार असल्याने कोणालाही वंदे भारतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. केवळ नैऋत्य रेल्वेचे अधिकारी वंदे भारतमध्ये राहणार आहेत. हुबळी ते मिरज दरम्यान कोणीही वंदे भारतमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नैऋत्य रेल्वे दिला आहे.
कोल्हापूरसाठी बेळगाव, हुबळीवर अन्याय नको
हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस व्हाया कोल्हापूर धावणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मिरजपासून कोल्हापूर व तेथून पुन्हा मिरज असा दोन तासांचा प्रवास करून एक्स्प्रेस पुण्याला पोहोचल्यास याचा फायदा कोणालाच होणार नाही. महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हुबळी-पुणे वंदे भारत कोल्हापूरला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ऐवजी कोल्हापूर-मुंबई व हुबळी-पुणे अशी स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करणे गरजेचे आहे. कोल्हापूरकरांना खूश करण्याच्या नादात बेळगाव, हुबळीवर अन्याय नको, अशी मागणी रेल्वे प्रवशांतून केली जात आहे.