For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रॉपीन वॉरियर्स धारवाडकडे हुबळी प्रिमियर चषक

10:28 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
ड्रॉपीन वॉरियर्स धारवाडकडे हुबळी प्रिमियर चषक
Advertisement

सीडीएम जेम्स उपविजेता : उत्कृष्ट फलंदाज जॉय सुल्लद तर सागर कम्मार उत्कृष्ट गोलंदाज

Advertisement

बेळगाव : हुबळी येथे बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित हुबळी प्रिमियर लिग ज्युनियर 16 वर्षाखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात ड्रॉपीन वॉरियर्स धारवाडने सीडीएम गेम्स संघाचा 11 धावांनी पराभव करुन हुबळी प्रिमियर लिग चषक पटकाविला. जॉय सुल्लद (झेवर गॅलरी), सागर कम्मार (ड्रॉपीन) यांना उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजांनी गौरविण्यात आले. हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ड्रॉपीन वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 6 गडी बाद 171 धावा केल्या. त्यात आरव ओसवालने 1 षटकार, 1 चौकारासह 63, सिद्धांत एन. ने 4 चौकारांसह 31 तर रोनक पवारने 2 चौकारांसह 24 धावा केल्या. आनंद अकादमी बेळगावतर्फे विवान भूसदने 20 धावांत 2 तर साईराज साळुंखेने 37 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 30 षटकात 8 गडी बाद 142 धावा केल्या. त्यात साईराज साळुंखेने 3 चौकारांसह 44 तर हैदरअली सय्यदने 1 षटकार व 3 चौकारांसह 31 धावा केल्या. ड्रॉपीन वॉरियर्सतर्फे सागर कम्मारने 31 धावांत 3 तर आरव ओसवाल व एस. सुमुख यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डेपो टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना 25.5 षटकात सर्व गडी बाद 76 धावा केल्या. त्यात शिवपुत्र वालीने 5 चौकारांसह 33 धावा केल्या. सीडीएम गेम्सतर्फे अभिषेक शिवशिंपागेरने 7 धावांत 4  गडी, शुभू मुंगूरवाडी व पृथ्वी कारसगी यांनी प्रत्येकी 2 तर रुहान शेखने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना सीडीएमने 10.2 षटकात 2 गडी बाद 76 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात शुभू मुंगूरवाडीने 8 चौकारांसह 45 धावा केल्या. विश्वास अलगुंडी व सिद्धांतने प्रत्येकी 1 गडी बाद केला. अंतिम सामन्यात ड्रॉपीन वॉरियर्स धारवाडने प्रथम फलंदाजी करताना 29.5 षटकात सर्व गडी बाद 94 धावा केल्या. त्यात अथर्व मानेने 2 चौकारांसह नाबाद 33 तर स्वयम खोतने 3 चौकारांसह 17 धावा केल्या. सीडीएमतर्फे शुभू मुंगूरवाडीने 23 धावांत 3 तर नमनने 2 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीडीएम गेम्स संघाचा डाव 27 षटकात 83 धावांत आटोपला. त्यात सुप्रित गेंजीने 2 चौकारांसह 30 तर शुभू मुंगूरवाडीने 2 चौकारांसह 13 धावा केल्या. ड्रापीन वॉरियर्सतर्फे सागर कम्मारने 18 धावांत 3 तर स्वयम खोत, एस. सुमुख यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामन्यानंतर धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे माजी समन्वयक बाबा भूसद, निखिल भूसद, अमित भूसद व बीडीके पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या ड्रॉपीन वॉरियर्स धारवाड व उपविजेत्या सीडीएम गेम्स संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. ड्रॉपीन वॉरियर्स संघात बेळगावच्या सोहम पाटील, स्वयम खोत, अथर्व माने, विख्यात काखांडकी यांचा समावेश होता. अंतिम सामन्यातील सामनावीर अथर्व माने, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज जॉय सोल्लद व उत्कृष्ट गोलंदाज सागर कम्मार यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.