For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुबळी-धारवाड जन्मभूमी तर बेळगाव कर्मभूमी!

11:19 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
हुबळी धारवाड जन्मभूमी तर बेळगाव कर्मभूमी
Advertisement

उपराजधानी बेळगावात औद्योगिक वसाहती वसविणार : भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांचे आश्वासन; बेळगाव विमानतळ इंटरनॅशनल करण्याचा प्रयत्न

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातून यावेळी भाजपने माजी मुख्यमंत्री, माजी सभापती व विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर यांना संधी दिली आहे. शेट्टर यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता निश्चितच त्यांच्या अनुभवाचा उपयोग बेळगाव जिल्ह्याला होईल. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दोन वेळा काम पाहिले आहे. तसेच विविध खात्यांच्या मंत्रिपदी असतानाही बेळगावच्या विकासाला हातभार लावला आहे. त्यामुळे खासदार झाल्यानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास कसा करणार, याबाबत ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेला संवाद.

►परजिल्ह्यातील उमेदवार असल्याचा उल्लेख होत आहे, यावर तुमचे म्हणणे काय?

Advertisement

सर्वसामान्यांना मी इतर जिल्ह्यातील आहे, याबद्दल कोणताही फरक पडत नाही. केवळ काँग्रेसच्या लोकांनी उपस्थित केलेला हा मुद्दा आहे. काँग्रेसकडे आरोप करण्यास कोणतेही प्रश्न नसल्याने त्यांनी परजिल्ह्यातील म्हणून माझा उल्लेख केला आहे. परंतु, हुबळी-धारवाड ही माझी जन्मभूमी असली तरी बेळगाव ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी इतर जिल्ह्यातील असल्याची जाणीव कुठेही झाली नाही.

►मतदारांनी आपणास का मतदान करावे?

बेळगाव लोकसभा मतदारसंघ हा माझ्यासाठी काही नवीन नाही. राज्याचा उद्योगमंत्री व महसूलमंत्री म्हणून काम करताना दोन वेळा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळले आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटकात महापुराचा फटका बसला. त्यावेळी शेतकऱ्यांना मदत पोहोचविणे, घर उद्ध्वस्त झालेल्यांना निधी मंजूर करणे यासाठी काम केले होते. सभापतीपद असताना बेळगावच्या सुवर्णसौधचे बांधकाम करताना महत्त्वाची भूमिका बजावली. कै. सुरेश अंगडी जिल्हाध्यक्ष असताना संपूर्ण जिल्हा कमळ फुलविण्यासाठी पिंजून काढला. त्यावेळी तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकांचा घरोघरी जाऊन प्रचार केला असल्याने हा जिल्हा माझ्यासाठी काही नवीन नाही.

►बेळगावचा विकास कसा साधणार?

बेळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा भाजपच्या कार्यकाळातच झाला आहे. कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून उडान-3 अंतर्गत बेळगावला देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा सुरू झाली. काँग्रेसच्या काळात केवळ शोभेची वस्तू म्हणून ठेवलेल्या विमानतळाला अंगडी यांनी व्यापक स्वरुप दिले आहे. खासदार मंगला अंगडी यांनी 310 कोटी रुपये मंजूर करून बेळगावला हायटेक विमानतळ टर्मिनल करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. भविष्यात बेळगाव विमानतळ इंटरनॅशनल करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली असून भू-संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. बेळगाव शहराला स्मार्ट सिटी, विविध शहरांना रेल्वेसेवा भाजपच्या काळातच मिळाली आहे. त्यामुळे यापुढील काळात याच मार्गाने विकास केला जाणार आहे.

►पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा फायदा होईल का?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनसामान्यांमध्ये एक वेगळी प्रतिमा आहे. 28 एप्रिल रोजी बेळगावमध्ये झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेला एक लाखाहून अधिक नागरिक उपस्थित होते. पंतप्रधानांच्या भाषणाने नागरिक मंत्रमुग्ध झाले. केवळ भाजपच नाही तर इतर पक्षांनाही मानणारे मोदींच्या सभेला उपस्थित असतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड होणार, हे निश्चित आहे. त्यांच्या सभेचा बेळगाव मतदारसंघात मोठा प्रभाव जाणवत आहे.

►काँग्रेसच्या गॅरंटी योजनांमुळे फटका बसणार का?

काँग्रेसच्या गॅरंटी योजना या तात्पुरत्या स्वरुपातल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिलेल्या योजना या कायमस्वरुपी आहेत. आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी, उज्ज्वला गॅस योजना, विमा योजना या योजनांचा लाखो नागरिकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे भूलथापांना बळी न पडता देशात केवळ एकच गॅरंटी आहे ती म्हणजे मोदी, हे लक्षात ठेवावे.

►मतदारसंघात लिंगायत, मराठा मते निर्णायक ठरणार का?

माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कोणत्याही समाजाचा नेता म्हणून काम केले नाही. कोणतेही मोठे नेतृत्व हे जातीमध्ये अडकवून चालणार नाही. मतदारसंघातील प्रत्येक जातींचा विकास करणे हा माझा उद्देश असणार आहे. मी आजवर जातीचे राजकारण केलेले नाही आणि यापुढेही करणार नाही. सर्व समाजांना पुढे घेऊन जात मतदारसंघाचा विकास करेन.

►खासदार झाल्यावर प्राधान्याने काय कराल?

मतदारसंघातून भाजपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे खासदार म्हणून संधी दिल्यास राज्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणून बेळगावला स्थान मिळवून देईन. उपराजधानीचा दर्जा मिळालेल्या बेळगावला इतर शहरांइतकेच महत्त्व मिळवून देईन. औद्योगिक वसाहती वसविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. औद्योगिक वसाहती आल्यास तरुणाईच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Advertisement
Tags :

.