For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाडला पाणी नको

11:36 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिडकल जलाशयातून हुबळी धारवाडला पाणी नको
Advertisement

माजी नगरसेवक संघटनेची मनपा आयुक्तांकडे मागणी : चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आयुक्तांचे आश्वासन

Advertisement

बेळगाव : हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी नेण्यासाठी पाईपलाईन घातली जात आहे. त्यामुळे हे काम तातडीने बंद करावे, या मागणीसाठी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने मंगळवार दि. 4 रोजी महापालिका आयुक्त शुभा बी. यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी मनपा आयुक्तांनी दिले. बेळगाव शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हिडकल जलाशयातून 18 एमजीडी पाणी बेळगावसाठी दिले जाते. मात्र अद्यापही बेळगावला पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. एलअॅण्डटी कंपनीकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पण योग्यरित्या पाणीपुरवठा करण्यात एलअॅण्डटी कंपनीला अद्यापही म्हणावे तसे यश आले नाही. 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी खोदकाम केले जात आहे. मात्र आठ दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी सोडले जात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात बेळगावकरांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते.

त्यातच आता हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाडला पाणी नेण्यासाठी पाईपलाईन घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याला कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याने बेकायदेशीररित्या सुरू असलेले काम तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी यावेळी माजी नगरसेवकांनी केली. त्याचबरोबर महापालिकेकडून मालमत्तांसाठी ई-आस्थी प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळेही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत महापालिकेच्यावतीने योग्य ती कार्यवाही हाती घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी हिडकल जलाशयातून पाणी नेण्यासाठी घालण्यात येत असलेल्या पाईपलाईनबाबत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. महापालिका आयुक्तांच्या कक्षात जवळपास दोन तास हिडकल जलाशय आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार रमेश कुडची, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी उपमहापौर मालोजी अष्टेकर, दीपक वाघेला, विनायक गुंजटकर, रणजित चव्हाण-पाटील यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.