हुबळीतील अत्याचार-एन्काऊंटर प्रकरण सीआयडीकडे
प्रतिनिधी/ बेंगळूर
हुबळीतील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केलेल्या आरोपीचा पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात बळी गेला. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे सोपविला आहे. त्यानंतर लागलीच सीआयडी अधिकारी हुबळीत दाखल झाले. त्यांनी प्राथमिक तपासाची कागदपत्रे जमा केली असून तपास सुरू केला आहे.
हुबळीच्या विजयनगर कॉलनीत 13 एप्रिल रोजी घराच्या आवारात खेळत असलेल्या पाच वर्षीय बालिकेला आमिष दाखवून मूळच्या बिहार येथील रितेश कुमार याने अपहरण केले. बालिकेवर अत्याचार करून नंतर तिचा गळा आवळून खून केला. या घटनेमुळे हुबळीत संतापाची लाट उसळली. नागरिकांनी अशोकनगर पोलीस स्थानकासमोर आंदोलन छेडले. रस्त्यावर टायर्स पेटवून संताप व्यक्त केला. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. अत्याचाराची घटना घडल्यानंतर आठ तासांत आरोपी रितेश कुमार याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्याला घटनास्थळी घेऊन जात असताना त्याने पोलिसांवर हल्ला करून फरार होण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला इस्पितळात नेण्यात आले. तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीआयडीचे अधीक्षक वेंकटेश यांच्या नेतृत्त्वाखाली डीवायएसपी पुनीतकुमार, पोलीस निरीक्षक मंजुनाथ हे मंगळवारी सायंकाळी हुबळीत दाखल झाले. त्यांनी अशोकनगर पोलिसांकडून प्राथमिक माहिती जमा केली. यावेळी प्राथमिक तपास व पुरावे सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आले.