HSC Result 2025 : उद्या बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहाल?
उद्या दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (दि. 5) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध होईल, तसेच त्याची प्रिंट काढून घेता येणार आहे. उद्या निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 73 परीक्षा केंद्रावर 50 हजार 826, सातारा जिल्ह्यात 34 हजार 576, सांगली जिल्ह्यात 32 हजार 830 तर अशी सुमारे 1 लाख 56 हजार 36 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षा दिली.
बारावीची परीक्षा यंदा 11 फेब्रुवारी ते 17 मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील 15 लाखांहून अधिक तर कोल्हापूर 1 लाख 18 हजार 232 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in, mahresult.nic.in संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या सहीने निकालाचे परिपत्रक जाहीर झाले आहे. गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधीत विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी 6 मेपर्यंत मुदत आहे.
विद्यार्थ्यांनी स्वत: किंवा महाविद्यालयातर्फे https://mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026 पर्यंत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी किंवा गुणसुधार परीक्षा देता येणार आहे. जुन-जुलै 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार 7 मे 2025 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.
नीटच्या परीक्षेतून रिकामे झालो तोपर्यंत दुसऱ्याच दिवशी बारावीचा निकाल असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धोडीशी धाकधुक आहे. किती गुण मिळतील, विशेष श्रेणी मिळणार का, अशा एक ना अनेक प्रश्नांनी विद्यार्थ्यांना त्रस्त केले आहे.