ऋतिक सावंत याची आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
ओवळीये गावचा सुपुत्र;
दिल्लीत होणार स्पर्धा
ओटवणे प्रतिनिधी
ओवळीये गावचा सुपुत्र ऋतिक सत्यवान सावंत याची तिसऱ्या वाको इंडिया खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडी बाबत सिंधुदुर्ग जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनने ऋतिक सावंत याला कळविले आहे.
या खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत ऋतिकची ६३ किलो वजनी गटातून निवड झाली आहे. ही तिसरी भारतीय खुली आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा ७ ते ११ फेब्रुवारीपर्यंत दिल्ली येथील तळकटोरा इंदोर स्टेडियम येथे होणार आहे. वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ किक बॉक्सिंग ऑफ ऑर्गनायझेशन (इटली) यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे.
ऋतिक सावंत याने यापूर्वी राज्यस्तरीय तसेच तेलंगणा व पंजाब येथील राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सिल्वर पदक पटकावले होते. किक बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर चांगले प्रदर्शन केल्यामुळे त्याची इंटरनॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ऋतिक दाणोली येथील बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहेत तर ओवळीये माजी सरपंच कै बळीराम सावंत यांचा नातू आहेत. या निवडीबद्दल आर्या स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कोच सागर सुर्वे यांनी ऋतिकचे अभिनंदन केले असुन विविध क्षेत्रातूनही अभिनंदन होत आहे.