For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : कंपनीतील वादातून HR हेडवर जीवघेणा हल्ला; तीन आरोपी गजाआड !

04:53 PM Oct 14, 2025 IST | NEETA POTDAR
satara   कंपनीतील वादातून hr हेडवर जीवघेणा हल्ला  तीन आरोपी गजाआड
Advertisement

          शिरवळ पोलिसांची तत्काळ कारवाई; हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Advertisement

सातारा : शिरवळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम कारवाईत कंपनीतील कॉन्ट्रॅक्ट व कामगार वादातून एच.आर. अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे.

घटना ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मौजे केसुर्डी (ता. खंडाळा) येथे घडली. डेटव्हायलर कंपनीचे एच.आर. हेड राजू गिरीशकुमार नायडू हे आपल्या हुंदाई अल्काझर (एमएच १२ एक्सएच ८८४०) कारने घरी जात असताना, तीन अनोळखी इसमांनी स्कुटरवर येत त्यांना थांबवून लोखंडी कोयता, रॉड व अरमाड केबलने गाडीवर हल्ला केला. हल्ल्यात नायडू यांना चेहऱ्यावर दुखापत झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले. हल्लेखोरांनी घटनास्थळी दहशत निर्माण करत पळ काढला.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, तसेच फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.

तपासादरम्यान पोलिसांनी खंडाळा, केसुर्डी एमआयडीसी व बावडा परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. यावेळी आरोपी प्रतिक विलास गायकवाड (रा. अजनुज, ता. खंडाळा) हा सापडून त्याला अटक करण्यात आली. चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून इतर दोघे आरोपी अनिकेत संपत शिंदे (रा. खडकी, ता. भोर, पुणे) व अनिकेत दयानंद संकपाळ (रा. केंजळ, ता. भोर, पुणे) यांनाही शिंदेवाडी एमआयडीसी परिसरातून पकडण्यात आले.

तीन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून लोखंडी कोयता, रॉड, अरमाड केबल व हल्ल्यात वापरलेली स्कुटर जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे.

शिरवळ पोलीस ठाण्याने परिसरातील सर्व कंपन्यांना आवाहन केले आहे की, कॉन्ट्रॅक्ट किंवा कामगार वादांवरून जर कोणी धमकावत असेल तर तत्काळ पोलिसांना कळवावे. अशा प्रकरणांवर तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल.

ही कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, सहाय्यक निरीक्षक किर्ती म्हस्के, उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, तसेच पोलीस कर्मचारी सचिन वीर, नितीन नलवडे, प्रशांत धुमाळ, तुषार कुंभार, सचिन फाळके, मनिषा बोडके, अरविंद बाळे, भाऊसाहेब दिघे, मंगेश मोझर, अजित बोराटे, सुरज चव्हाण, अक्षय बगाड, दिपक पालेपवाड यांनी केली.

या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी शिरवळ पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :

.