Alphonso Mangos : बॉक्स देवगड हापूसचा, विकला जातोय कर्नाटकी आंबा, आंब्यामध्ये सुद्धा बनवाबनवी
देवगड हापूस, रत्नागिरी हापूस हा परदेशात ही निर्यात होतो.
By : विद्याधर पिंपळे
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये कोपऱ्या-कोपऱ्यावर कमी दरातील आंब्यांची विक्री टेंपोमधून सुरू आहे. बॉक्स देवगडचा, टेंपो कोकण पासिंगचा व प्रत्यक्षात मात्र कमी दरातील कर्नाटकी हापूस आंब्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. कमी दरातील, कमी चवीचा कर्नाटकी आंब्याची विक्री शहरामध्ये सुरू आहे.
यामुळे आंबा देवगड हापूस की रत्नागिरी हापूस अशी शंका आता लोकामध्ये निर्माण झाली आहे. भारतात १५०० जातीचे आंबे आहेत. या प्रत्येक आंब्याच्या जातीची चव, आकार, रंग वेगळा आहे. देवगड हापूस, रत्नागिरी हापूस हा परदेशात ही निर्यात होतो. हा आंबा आतून केशरी, पातळ साल, बाहेरून हिरवा आतून पिवळा आकार उभट असा असतो.
पण कर्नाटकी हापूसची चव, दर यामध्ये मोठी तफावत आहे. सध्या आंबा सिझन सुरू असल्याने, कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये हापूस, लालबाग, तोतापुरी, मद्रास आंब्याची आवक सुरू आहे. यामध्ये पायरीचाही समावेश आहे. तोतापुरी हा कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलगंणा येथून तर पायरी आंबा गुजरातचा असून याचा आमरससाठी वापर होतो.
ग्राहकांना आंब्या विषयी अज्ञान असल्याने, देवगड हापूस, बाजारात देवगड रत्नागिरी हापूस म्हणून विकला जाऊ लागला आहे. बॉक्सवर देवगड तर आत वेगळाच असल्याचा अनेकांना आता आंबा अनुभव येत आहे. देवगडच्या बॉक्समधून विकला जाणारा आंबा कोणता आहे ? याची माहिती लोकांना नाही. आता कोकण पासिंगच्या टेंपोमधून देवगड रत्नागिरी हापूसची विक्री शहरामध्ये सुरू आहे.
यामुळे टेंपो कोकण पासिंगचा बॉक्स देवगडचा तर आंबा कोणता? अशी शंका आता ग्राहकामधून येऊ लागली आहे. नैसर्गिक आंबा पिकवण्यासाठी १० सेमी जाडीच्या गवती पेढयांच्या थरावर आंब्याचा एक थर ठेऊन पिकवला जातो. हा आंबा नैसर्गिकरित्या ८ ते १० दिवसात पिकला जातो कोयीकडे तर कोयीकडून सालीकडे अशा पध्दतीने पिकत असतो.
आंबा पिकताना रंग, प्रत, सुगंध यामध्ये बदल होत असल्याचे सांगण्यात येते. तर आंबा पिकवण्यासाठी इथिलिन वायूचा वापर केला जातो. तत्काळ आंबा पिकवण्यासाठी, कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर होत आहे. पण आता यावर बंदी आहे. मग नैसर्गिक पिकलेला हापूस व देवगड हापूस कसा समजणार? याबद्दल लोकामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
कोल्हापूर बाजारपेठेत क्यू आर कोडचा आंबाच नाही
देवगड आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री सुरू आहे. खरा आंबा कसा ओळखावा यासाठी बागायतदार हे क्यूआर कोड स्टिकर वापरतात. कोकणातील कांही बागायतदारांनी याचा वापर केला असला तरी, हा आंबा कोल्हापुरात येत नाही. क्यूआर कोडचा आंबा कोल्हापुरात येण्यासाठी किमान चार वर्षे लागणार असल्याची माहिती होलसेल आंबा व्यापारी इम्रान बागवान यांनी सांगितले.
ओरिजनल आंब्याची कुंडली...
शेतकरी व बागायतदार हे जीआय मानांकन घेतलेल्या आंब्यासाठी, क्विक रिस्पॉन्स कोड (चौरस ग्रीडमध्ये काळे चौरस ठिपके) चा वापर केला जातो. जीआय मानांकन असल्याशिवाय क्यूआर कोड घेता येत नाही. यासाठी विशेष कंपनीबरोबर करार करावा लागतो. यासाठी किमान आठ लाख फळे किंवा १ लाख क्यूआर बॉक्स असणे गरजेचे आहे. प्रती क्यूआर कोडसाठी ६५ पैसे तर बॉक्ससाठी ३ रूपये मोजावे लागते. यासाठी स्कॅनिंग मशिन वा स्मार्ट फोनचा वापर करावा लागतो. यामध्ये ओरिजनल आंब्याची कुंडली मांडली जाते.