असंतुष्टांचा चक्रव्यूह कसा भेदणार?
सत्ताधारी काँग्रेसची परिस्थितीही काही भाजपपेक्षा वेगळी नाही. आपल्याच सरकारविरुद्ध काँग्रेसचे आमदार उघडपणे भ्रष्टाचाराचा आरोप करू लागले आहेत. राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार बी. आर. पाटील यांनी गृहनिर्माण खात्यातील भ्रष्टाचारासंबंधी उघडपणे आरोप केला आहे. त्यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपमधील गटबाजी टिपेला पोहोचली आहे. लवकरच भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बी. वाय. विजयेंद्र यांच्या खांद्यावर पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हायकमांडने टाकू नये, अशी मागणी केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदावर कारकळचे आमदार व्ही. सुनीलकुमार यांची नियुक्ती करावी, ही मागणी वाढली आहे. विजयेंद्र विरोधक व तटस्थ गटातील नेत्यांनी सुनीलकुमार यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर केंद्रीयमंत्री व्ही. सोमण्णा हेही प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेंगळूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी त्यांची भेट घेऊन तब्बल अर्धा तास चर्चा केली आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर येडियुराप्पा पक्षात पुन्हा सक्रिय झाले आहेत. आता आपण पक्षाच्या कार्यालयात सतत येत राहणार, राज्याचाही दौरा करणार, असे त्यांनी जाहीर केले आहे.
अमित शहा बेंगळूरला येणार होते. त्याच दिवशी विजयेंद्र यांच्याविरुद्ध दंड थोपटलेले माजी खासदार जी. एम. सिद्धेश्वर यांच्या निवासस्थानी भाजप असंतुष्टांची बैठक झाली. रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत नेतृत्वबदलाच्या मागणीवर चर्चा झाली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्याआधी अमित शहा स्वत: असंतुष्ट नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत विजयेंद्र यांची निवड आम्ही मान्य करणार नाही, ही असंतुष्टांची भूमिका आहे. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर असंतुष्ट नेत्यांचा जोर कमी झाला असला तरी नेतृत्वबदलाची त्यांची मागणी कायम आहे. या मागणीवर असंतुष्ट नेते ठाम आहेत. हवे तर आपणही या नेत्यांशी चर्चा करू, असे येडियुराप्पा यांनी सांगितले आहे. कर्नाटकात येडियुराप्पा व त्यांच्या कुटुंबीयांचे अस्तित्व आता राहिले नाही, अशी स्पष्ट भूमिका बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी मांडली आहे.
सद्यपरिस्थितीत विजयेंद्र यांना अध्यक्षपदावरून बाजूला केल्यास कर्नाटकातील प्रबळ लिंगायत समाज भाजपवर नाराज होणार, असे येडियुराप्पा समर्थकांचे म्हणणे आहे. लिंगायत समाजाकडेच प्रदेशाध्यक्षपद द्यायचे असेल तर केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा हेही याच समाजाचे आहेत, त्यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी का टाकू नये? असा प्रश्न उपस्थित करतानाच सुनीलकुमार हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत. संघ परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची निवड करणे योग्य ठरणार आहे, असे असंतुष्ट व तटस्थ गटातील नेत्यांना वाटते. आपण प्रदेशाध्यक्ष झाल्यावर सुनीलकुमार यांच्या खांद्यावर पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली होती. कारण नसताना त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला, असे विजयेंद्र यांचे म्हणणे आहे. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची हकालपट्टी केल्यानंतर बंडोबा थंड होणार, अशी अपेक्षा होता. ही अपेक्षा फोल ठरली आहे. कोणत्याही परिस्थितीत विजयेंद्र यांना पदावरून हटवावे या मागणीवर असंतुष्ट नेते ठाम आहेत. हायकमांडचा सध्याचा कल लक्षात घेता विजयेंद्र यांच्यावरच पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येणार, हे स्पष्ट आहे.
सत्ताधारी काँग्रेसची परिस्थितीही काही भाजपपेक्षा वेगळी नाही. आपल्याच सरकारविरुद्ध काँग्रेसचे आमदार उघडपणे भ्रष्टाचाराचा आरोप करू लागले आहेत. राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार बी. आर. पाटील यांनी गृहनिर्माण खात्यातील भ्रष्टाचारासंबंधी उघडपणे आरोप केला आहे. त्यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. राजीव गांधी गृहनिर्माण निगममध्ये पैसे दिल्यावरच घरांचे वाटप केले जाते, असा त्यांचा आरोप आहे. ऑडिओतील आवाज आपलाच आहे, ही चर्चा आपणच केली आहे, जे सत्य आहे ते आपण सांगितले आहे, सत्य सांगण्यासाठी भीती कोणाची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आळंद मतदारसंघासाठी 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ही गोष्ट या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्यालाच माहीत नाही. मौलाना आझाद शाळा इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याच्या भूमिपूजनासाठीही आपल्याला निमंत्रित करण्यात आले नाही. आळंद मतदारसंघासाठी 2 हजार घरे मंजूर करावीत, यासाठी आपण पत्र दिले होते. त्या पत्रावर कोणतीच कारवाई झाली नाही. ग्राम पंचायतीच्या अध्यक्षांच्या विनंतीवरून 1 हजार 950 घरे मंजूर करण्यात आली आहेत. ग्राम पंचायत अध्यक्षांच्या पत्राला जी किंमत आहे ती आपल्या पत्राला नाही, असे सांगत आपल्याच सरकारविरुद्ध त्यांनी खदखद व्यक्त केली आहे. यापूर्वीही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिलेल्या पत्रामुळे बी. आर. पाटील ठळक चर्चेत आले होते.
बी. आर. पाटील यांनी सरकारी घरे मिळवताना कसा भ्रष्टाचार सुरू आहे, याविषयी आपल्याच सरकारविरुद्ध आरोप करीत खळबळ माजवली असतानाच कागवाडचे आमदार राजू कागे यांनीही आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. दोन वर्षात कोणतीही कामे करता येईनात. विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नाही. अशा परिस्थितीत आमदार म्हणून आम्ही कशासाठी रहायचे? आपणही राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत आहे, असे त्यांनी उघडपणे सांगितले आहे. आणखी काही आमदारांनीही विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नाही, असे सांगितले आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांच्यावरही स्थानिक नेते नाराज झाले आहेत. आम्ही आमच्या समस्या कोणासमोर सांगायच्या? असा प्रश्न असंतुष्ट आमदारांनी उपस्थित केला आहे. गृहनिर्माण विभागातील भ्रष्टाचारावर स्वपक्षीय आमदारांचे आरोप, त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी याच मुद्द्यावर सरकारची केलेली कोंडी आदी कारणांमुळे हायकमांड नाराज झाले आहे. नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यावेळी या घडामोडींबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षातील असंतोष उफाळून आला आहे.
-रमेश हिरेमठ