For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुमच्या मोबाईलमधील डाटा किती सुरक्षित?

12:02 PM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
तुमच्या मोबाईलमधील डाटा किती सुरक्षित
Advertisement

डाटा चोरीचे प्रकार वाढले : बँक खात्यांबरोबरच खासगी माहितीची होतेय चोरी : एपीके-लिंक्ड फाईल ठरत आहेत धोक्याच्या

Advertisement

बेळगाव : सध्या बेळगावात सायबर गुन्हेगारी विषयक जागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सायबर क्राईम विभागाचे अधिकारी व कर्मचारी शाळा-कॉलेजमध्ये जाऊन जागृती करीत आहेत. प्रमुख चौकांमध्ये सायबर गुन्हेगारी विषयी फलक उभारण्यात आले आहेत. जर फशी पडलाच तर 1930 क्रमांकावर त्वरित संपर्क साधा, असे सांगत जागृतीवर भर देण्यात येत आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, सीईएनचे पोलीस उपअधीक्षक जे. रघू, पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जनजागृतीचे प्रयत्न करीत आहेत. तीन महिन्यांपूर्वी मेघा गॅसच्या नावे फसवणुकीचे प्रकार सुरू झाले होते. यासंबंधी कंपनी आणि सायबर क्राईम विभाग या दोघा जणांनी जागृतीची मोहीम राबवूनही फसवणुकीचे प्रकार अद्याप थांबले नाहीत.

एकीकडे पोलीस यंत्रणा जागृतीवर भर देत आहे तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार रोज आपल्या कार्यपद्धतीत बदल करीत आहेत. एखाद्या बँक ग्राहकाच्या खात्यातून रक्कम लुटल्यानंतर, डिजिटल अॅरेस्टच्या माध्यमातून सावजाला लाखो रुपयांना ठकविल्यानंतर सहजपणे पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी गुन्हेगार नेहमी वेगवेगळी शक्कल लढवत असतात. सध्या सुरू असलेले सायबर गुन्हेगारीचे प्रकार लक्षात घेता नागरी समाजाची भिती वाढविणारी अशीच आहे.

Advertisement

आजवर केवळ तुमचा एटीएम कार्ड ब्लॉक झाला आहे, नवे कार्ड सुरू करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेले ओटीपी कळवा असे सांगत सायबर गुन्हेगार बँक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम पळवित होते. अशा प्रकाराच्या गुन्हेगारांची डोकेदुखी वाढली होती. आता गुन्हेगार इतके अपडेट झाले आहेत की त्यांना ओटीपीचीही गरज नाही. एपीके फाईलच्या मदतीने व व्हाटसअॅप ग्रुपवर एखादी लिंक पाठवून मोबाईल ग्राहकांचा डाटा चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. एपीके (अँड्राईड अॅप्लिकेशन पॅकेज) फाईलच्या माध्यमातून आजवर केवळ एखाद्या मोबाईल ग्राहकाचा डाटा चोरला जायचा. आता गुन्हेगार इतके अपडेट झाले आहेत की सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या एखाद्या संपूर्ण ग्रुपचीच माहिती क्षणार्धात चोरण्याचे तंत्रज्ञान गुन्हेगारांनी आत्मसात केले आहे. त्यामुळेच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

इन्स्ट्राग्राम, फेसबुक, व्हाटसअॅपच्या माध्यमातून संपूर्ण ग्रुपचीच माहिती चोरण्यात येत आहे. चोरलेल्या माहितीचा वापर गुन्हेगार कधी करतील, याचा नेम नाही. माहिती चोरल्यानंतर लगेच त्याचा वापर करतीलच असे नाही. एपीके व लिंक्ड फाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डाटा चोरीचे प्रकार सुरू आहे. एखाद्या व्हाटसअॅप ग्रुपमध्ये पाठविलेल्या लिंकवर त्या ग्रुपमध्ये सक्रिय असलेल्या सदस्याने क्लिक केले तर त्या ग्रुपमधील अनेकांची माहिती सायबर गुन्हेगारांना मिळते. अत्यंत वेगाने इतर ग्रुपवरही एपीके फाईल किंवा लिंक पाठविली जात आहे. मोबाईलमधील इतर माहितीप्रमाणेच बँक व्यवहारासंबंधीची माहितीही सहजपणे अशा पद्धतीने सायबर गुन्हेगारांना मिळते. एकाचवेळी या माहितीचा वापर न करता ग्रुपमधील वेगवेगळ्या सदस्यांना हेरून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम पळविली जाते. दिवसेंदिवस सायबर गुन्हेगार सावजांना ठकविण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवित आहेत. त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करून घेण्यासाठी व स्वत:ची माहिती स्वत:जवळच राहिल याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.

डिजिटल अॅरेस्टचे प्रकारही सुरूच आहेत. खरेतर पोलीस अधिकाऱ्यांनी अनेकवेळा याविषयी खुलासा केला आहे. पोलीस दलात डिजिटल अॅरेस्ट हा प्रकारच नाही. गुन्हेगारी कारवाईत सहभागी असलेल्या एखाद्याला अटक करायची असेल तर पोलीस स्वत: त्याला नोटीस पाठवितात. त्याला पकडण्यासाठी त्याच्या घरी पोहोचतात. याविषयी सातत्याने जागृती करूनही व्हाटसअॅपच्या माध्यमातून डिजिटल अॅरेस्टचे प्रकार सुरूच आहेत. मध्यंतरी तुमच्या नावे आलेल्या कुरियरमध्ये अमली पदार्थ आहे. अमली पदार्थाच्या तस्करीत तुमचा सहभाग आहे, असे सांगत डिजिटल अॅरेस्ट केले जात होते. आता यासाठीही वेगवेगळी कारणे शोधण्यात आली आहेत. सावजाला एकाच ठिकाणी बंदिस्त करून प्रकरण मिटवून घे नाहीतर तुला अटक करण्यासाठी आमचे अधिकारी तुझ्या घरी पोहोचत आहेत. असे सांगत मोठ्या प्रमाणात ठकविण्याचे प्रकार सुरूच असून अशा प्रकारांना सर्वसामान्यांपेक्षाही उच्चशिक्षितच बळी पडत आहेत.

सुरक्षा-उपायांवर भर द्या

सोशल मीडियाच्या माध्यमातून डाटा चोरीच्या प्रकाराविषयी सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. फसवणूक होऊ नये यासाठी आज काल टू फॅक्टर किंवा मल्टीफॅक्टर अॅथॅन्टिकेशनची सुविधा आहे. त्याचा वापर करावा. सहजपणे सायबर गुन्हेगारांना एखाद्याचा डाटा चोरता येऊ नये यासाठी सुरक्षा घेणे गरजेचे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

-सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर

Advertisement
Tags :

.