For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘घामा’ची कमाई किती...

06:33 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘घामा’ची कमाई किती
Advertisement

‘घाम गाळून पैसा मिळविणे’ प्रतिष्ठेचे मानण्याची आपली पद्धती आहे. कॅरोल रोझलीन या नावाची एक फिटनेस इन्फ्ल्यूएन्सर आणि आणि कंटेंट क्रिएटर महिला आहे. तिने हा वाक्प्रचार शब्दश: खरा करुन दाखविला आहे. तिने बख्खळ पैसा मिळविण्याचा हा एक नवाच आणि अद्भूत मार्ग शोधून काढला असून ती चक्क स्वत:चा ‘घाम’ विकण्याचा व्यवसाय करते. ती प्रतिदिन व्यायाम करते आणि व्यायाम करताना घाम येतो, तो साठविते. तिच्या घामाला मोठी मागणीही आहे. रोझलीन ही ब्राझील देशाची असून ती मॉडेलिंगचा व्यवसायही करते. लोक तिच्या व्यायामाचे (वर्कआऊटचे) व्हिडीओ चित्रण आवडीने बघतात. त्यामुळे तिच्या घामाला मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते, असा तिचा अनुभव आहे. तिच्या घामाची किंमत कमी नाही.

Advertisement

एका छोट्या कुपीसाठी 25 हजार रुपये मोजावे लागतात. कित्येक वर्षांपासून ती हा व्यवसाय करीत आहे. आता लोक तिचा घाम विकत घेऊन त्याचे नेमके काय करतात, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण तिच्या ‘घामाची’ तिला मोठी किंमत मिळते हे मात्र सत्य आहे. तिच्या एका दर्शकानेच तिला हा व्यवसाय सुचविला होता, असे बोलले जाते. प्रथम तिने ही सूचना चेष्टा वाटून टाळली होती. तथापि, नंतर तिला आपल्या घामाचे ‘मोल’ कळले. हा व्यवसाय केल्यास मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल, हे लक्षात आल्यानंतर तिने तो करण्यास प्रारंभ केला. लोकांना, विशेषत: अनभिज्ञ लोकांना तिच्या घामाचे विशेष आकर्षण आणि व्रेझ आहे. त्यामुळे ते त्यासाठी स्वत:चा खिसा हलका करावयास राजी असतात. तीही या आकर्षणाचा लाभ उठवते. आपला घाम मोठ्या प्रमाणात खपावा, म्हणून ती आपले घामाने निथळलेले व्यायाम करतानाचे व्हिडीओ आणि छायाचित्रे प्रसारित करत असते. ते तिचे रुप पाहून अनेकजण अक्षरश: वेडावतात आणि तिचा घाम विकत घेतात. अक्षरश: स्वत:च्या ‘घामा’ची कमाई अशा प्रकारे कोट्यावधी रुपयांची असणारी ही जगातील एकमेव महिला असावी, असे तिच्यासंबंधी बोलले जाते. आपल्या या व्यवसायाचा अर्थातच तिला अभिमान वाटतो. मी केवळ घाम विकत नाही. तर त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांमध्ये व्यायाम आणि सुदृढ शरीरप्रकृतीचे महत्वही पोहचविते. माझ्या ‘घामा’पासून प्रेरणा घेऊन लोक व्यायाम करण्यास प्रारंभ करतात आणि त्याचे महत्व त्यांच्या मनात ठसते, असे रोझलीन हिचे प्रतिपादन आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.

Advertisement
Advertisement
Tags :

.