भिलवडी-अंकलखोप राज्यमार्ग किती बळी घेणार
भिलवडी / घन: शाम मोरे :
भिलवडी-माळवाडी महामार्गावर शनिवारी सरळी पुलादरम्यान शाळकरी विद्यार्थ्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने उडविले. आईच्या हातातून एका निष्पाप लेकराला नियतीने हिरावून घेतले. माळवाडी, भिलवडी, औदुंबर फाटा ते अंकलखोप दरम्यानचा राज्यमार्ग सहा विद्यार्थी, एक शिक्षिका यांच्यासह पंधराहून अधिक निष्पाप जीवांचे बळी घेणारा मृत्यूमार्ग बनला आहे.
पलूस तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या भिलवडी या मध्यवर्ती गावातून वाहनांची मोठी वर्दळ असते. माळवाडी ते अंकलखोप पेट्रोल पंप पाच किलोमीटरचा मार्ग. दरम्यान अंगणवाड्या, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, सहकरी संस्था, बँका, पतसंस्था, हॉटेल, दवाखाने, दवाखाने, विविध प्रकारची दुकाने सारे रस्त्याच्या दुतर्फा. साहजिकच शालेय विद्यार्थी, नागरिक, गृहिणी, ग्रामस्थ कर्मचाऱ्यांनी सदा सर्वकाळ फुलून गेलेला हा परिसर.
मूळच्या अरुंद रस्त्याचे विस्तारीकरण झाले नि गजबजलेल्या परिसरातून वाहनांचे वेग वाढू लागले. छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, रहदारीच्या ठिकाणी वेगावर नियंत्रण नसणे या कारणामुळे दररोज छोटेमोठे अपघात घडत आहेत. आजपर्यंत पंधराहून अधिक निष्पाप जीवांचे बळी गेले. पहाटे व्यायामाला जाणाऱ्या नागरिकांचाही यामध्ये समावेश आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. भिलवडीच्या पूर्व बाजूस जुना सरळी पूल व नवीन पूल अशी दुहेरी वाहतूक आहे. उंची असणारा नवीन पूल हा वाहतुकीचा मार्ग असल्याचा गैरसमज होऊन नवीन वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. अंकलखोप येथील महावितरणच्या वीज केंद्राजवळ असणारे धोकादायक वळण देखील अपघातास निमंत्रण देत आहे.
पी.डबल्यू.डी.ने सरळी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता दुभाजक बांधून ठळक दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर लावावेत. शाळेच्या बाजूस शाळा असल्याच्या व वेग मर्यादा दर्शविणारे बोर्ड लावावेत, अत्यावश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे बनवावेत. वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत. तरच हे अपघाती मृत्यू थांबतील.