भावी शिक्षक आणखी किती परीक्षा देणार ?
कोल्हापूर /अहिल्या परकाळे :
प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करायचे असेल तर पुर्वी बारावीनंतर डीएड तर पदवीनंतर बीएड करावे लागत होते. परिणामी डीएड व बीएड कॉलेजचे सर्वत्र पेव फुटले आणि दोन्ही पदव्या घेणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. पदवीप्राप्त उमेदवार रोजगारापासून वंचित राहू लागले म्हणून राज्य शासनाच्या वतीने 2013 पासून टीईटी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारच शिक्षक बनतील अशी अट घातली. त्यातही जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे पुन्हा राज्यशासनाने अभियोग्यता चाचणीची अट घातली. येवढ्या परीक्षा उत्तीर्ण होवूनही नोकरभरतीअभावी बेरोजगार राहावे लागते. त्यामुळे किती परीक्षा द्यायच्या असा प्रश्न भाव शिक्षकांना पडला आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुसती परीक्षा घेऊन चालणार नाही, तर नोकरभरती तातडीने केली पाहिजे अशी मागणी परीक्षार्थींकडून केली जात आहे.
टीईटी परीक्षा 2013 पासून सुरू झाली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा 2017, 2019 आणि 2021 नंतर आत्ता 2024 ला झाली. प्रत्येकवेळच्या परीक्षेतील अंतर पाहिले तर जवळपास तीन वर्षे भावी शिक्षकांना टीईटी परीक्षेची प्रतिक्षा करावी लागली. वय वाढत असल्याने परिणामी लग्न करून संसारात आडकले जातात. काहीजण खासगी शाळांमध्ये पाच ते दहा हजार रूपयांवर राबतात. बरोबरीचे नियमित शिक्षक लाखो रूपये घेत असल्याने आपले वेतन सांगण्यासही संकोच वाटत असल्याच्या भावना परीक्षेला आलेल्या भावी शिक्षकांनी बोलून दाखवल्या. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने भरती करावी, अशी मागणी आहे. बारावीनंतर डीएड आणि पदवीनंतर बीएड या परीक्षाही शासनाच्याच आहेत. परंतू वारंवार शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये बदल करून शासन आपणच घेतलेल्या परीक्षांवर विश्वास ठेवत नसल्याचे बोलले जात आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी टेट परीक्षा
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील पेकरभरतीसाठी टेट परीक्षेचे आयोजन केले जाते. ही परीक्षाही गेल्या अनेक वर्षापासून झाली नसल्याने परीक्षार्थींमध्ये नाराजीचा सूर आहे.
एकाच शिक्षकाकडून अनेक विषयाचे अध्यापन
जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये एकाच शिक्षकाकडून अनेक विषयाचे अध्यापन केले जात आहे. तरीही राज्य सरकार नोकरभरती करीत नाही. किती दिवस वाट पाहायची, असा प्रश्न आहे.
अमोल महापुरे (कोल्हापूर)