महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महामार्गावरील दरोडे खरे किती? खोटे किती?

11:41 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दरोडेखोरांनी पळविलेल्या कारमध्ये सापडली मोठी रक्कम, पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात; झटपट श्रीमंत होण्यासाठी कार अडवून रक्कम पळविण्याच्या घटनांत वाढ

Advertisement

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हरगापूरजवळ दोन दिवसांपूर्वी झालेल्या दरोडा प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. दरोडेखोरांनी प्रत्यक्षात 75 लाख रुपये पळविल्याची फिर्याद संकेश्वर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. मात्र दरोडेखोरांनी पळविलेली कार सापडली असून यामध्ये 1 कोटी 56 लाख 50 हजार रुपये आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण प्रकरणच संशयास्पद वाटत असून पोलीस अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या घटनेसंबंधी पोलीस दलाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही. संकेश्वरचे पोलीस निरीक्षक शिवशरण अवजी यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रतिसाद देत नाहीत. एकंदर प्रकार लक्षात घेता संकेश्वर पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Advertisement

शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी हरगापूरजवळ कार अडवून पिस्तुलीचा धाक दाखवत मोठी रक्कम असलेली कार पळविण्यात आली होती. या कारमध्ये 3 कोटी 10 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली होती. त्याच दिवशी रात्री उशिरा दरोडेखोरांनी कारसह 75 लाख रुपये पळविल्याची एफआयआर दाखल करण्यात आली. शनिवार दि. 16 नोव्हेंबर रोजी नेर्लीजवळ कार सापडली आहे. संकेश्वर पोलिसांनी ती कार बेळगावला आणून तपासणी केली असता त्या कारमध्ये 1 कोटी 56 लाख 50 हजार रुपये आढळून आल्याचे समजते. प्रत्यक्षात 75 हजार रुपयांचा दरोडा झाला आहे. तर कारमध्ये इतकी मोठी रक्कम कोठून आली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत कारमध्ये आढळलेली रक्कम मोजण्यात येत होती.

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याचे प्रकार काही नवे नाहीत. कर चुकविण्यासाठी महाराष्ट्र व केरळमधील काही सराफ कारमध्ये गुप्त कप्पे तयार करून मोठ्या प्रमाणात रक्कम नेत असतात. यापूर्वी अशा पद्धतीने रक्कम व दागिने नेताना कार अडवून पोलीस अधिकाऱ्यांनीच ते पळविल्याची उदाहारणे आहेत. यासंबंधी संकेश्वर, यमकनमर्डी, हिरेबागेवाडी, कित्तूर पोलीस स्थानकात वेळोवेळी एफआयआर दाखल झाले आहेत. 9 जानेवारी 2021 रोजी हत्तरगी टोल नाक्यावर एक कार अडवून तपासणी करण्यात आली होती. चार किलो 900 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलीस अधिकाऱ्यांनी पळविल्याचा गंभीर आरोप झाला होता. या प्रकरणी याच संकेश्वर पोलीस स्थानकात एफआयआरही दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांना  चांगलेच शेकले होते. गृहखात्याने या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविली होती.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाच सहभाग असल्यामुळे कारमधून चोरलेले सोने काही परत मिळाले नाही. या घटनेनंतर महामार्गावरील दरोडे काही काळापुरते थांबले होते. आता पुन्हा सुरू झाले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात काही अधिकाऱ्यांनी आपले खबरी ठेवले आहेत. दागिने किंवा रक्कम घेऊन तेथून कार सुटली की बेळगावातील अधिकाऱ्यांना टीप मिळते. महामार्गावर कार अडवून कारमधील दागिने पेंवा रक्कम परत करण्यासाठी मांडवली केली जाते. यासाठी खासगी दलालही कार्यरत आहेत. पोलीस अधिकारीच महामार्गावर वाहने अडवून दागिने रोकड पळविल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. केवळ करचुकविण्याच्या प्रयत्नात व्यावसायिक दरोडेखोर, पोलीस अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अलगदपणे अडकत आहेत. आता तर पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच या व्यावसायिकांजवळ काम करणारे कामगार झटपट श्रीमंतीसाठी कार अडवून रक्कम पळविताना दिसत आहेत.

30 जून 2024 रोजी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कित्तूरजवळ कार अडवून दरोडेखोरांनी 10 लाख रुपये पळविल्यासंबंधी कित्तूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर एक महिन्यांनी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर चार दरोडेखोर सापडले. मथुरा पोलिसांनी त्यांची चौकशी केली त्यावेळी कित्तूरजवळ कार अडवून 1 कोटी रुपये पळविल्याची कबुली त्यांनी दिली होती. सध्या संकेश्वर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या दरोडा प्रकरणालाही कलाटणी मिळाली असून या प्रकरणाचे सत्य काय आहे? याची माहिती देण्याऐवजी संकेश्वर पोलीस मौन पाळत आहेत. त्यामुळे एकंदर प्रकरणाभोवती संशय अधिक गडद झाला आहे. महामार्गावरील दरोडे खरे किती? खोटे किती? असा प्रश्न उपस्थित केला जात असून पोलीस यंत्रणेने पुन्हा कार अडवायला सुरुवात केली आहे का? याचीही चौकशी करण्याची गरज आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article