मुंग्यांची संख्या नेमकी किती...
‘मुंगी’चा परिचय प्रत्येकाला आहे. मुंगीला आपण क्षुल्लक मानतो. कित्येक मुंग्या प्रतिदिन आपल्या पायाखाली येऊन प्राण गमावत असतात पण त्यांची फारशी चिंता केली कोणाला नसते. मात्र, जगात मुंग्या असतील तरी किती, हा प्रश्न काहीवेळा आपल्या मनात उमटल्याशिवाय रहात नाही. संशोधकांनी यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जगात मुंग्यांची संख्या अपार आहे, एवढे त्यांच्या संशोधनावरुन स्पष्ट होत आहे. दोन वर्षांपूर्वी हे संशोधन हाती घेण्यात आले.
या मुंग्यांची अनेक वैशिष्ट्यो आहेत. पृथ्वीवर निर्माण झालेल्या आद्य बहुपेशीय सजीवांपैकी त्या एक आहेत. 10 कोटी वर्षांपूर्वीचे मुंग्यांचे अवषेश संशोधकांना सापडले आहेत. याचाच अर्थ असा की, मुंग्या डायनासोरच्या काळातही होत्या. डायनासोर काळाच्या उदरात लुप्त झाले. पण मुंग्या मात्र अनेक हिमयुगे, वणवे, अतिविनाशकारी भूकंप आणि ज्वालामुखींचे उद्रेक पचवून आजही प्रचंड संख्येने अस्तित्वात आहेत. त्यांचा हा चिवटपणा संशोधकांना त्यांच्याकडे आकर्षित करतो.
जगात कोणत्याही एका क्षणी 20 क्वाड्रिलीयन मुंग्या जिवंत असतात, असे व्यापक संशोधनातून व्यक्त झालेले अनुमान आहे. ही संख्या शब्दांनी किंवा संख्येने लिहून दाखविण्याच्या पलीकडची आहे. सध्या जगात मानवांची संख्या 800 कोटींच्या पार गेली आहे. तर मुंग्यांची संख्या प्रत्येक माणसामागे 25 लाख इतकी प्रचंड आहे. एका माणसाच्या संपूर्ण शरीरावरही त्या मावू शकणार नाहीत, एव्हढ्या मोठ्या संख्येने त्या आहेत. याचाच अर्थ असा की त्यांची संख्या 800 कोटी गुणिले 25 लाख इतकी आहे. ही कल्पनेच्या पलिकडची संख्या आहे. निसर्गचक्रात मुंग्यांचे महत्व प्रचंड आहे. मुंग्या नसत्या, तर कदाचित मोठे जीव निर्माणही होऊ शकले नसते, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. मुंग्यांमुळे वनस्पतींसाठी आणि इतर सजीवांसाठी आवश्यक असलेल्या पोषकद्रव्य चक्राचे संरक्षण आणि संवर्धन होते. पृथ्वीवर आज त्यांच्या 12 सहस्राहून अधिक प्रजाती आहेत. त्यांच्या प्रजातींच्या संख्येत प्रत्येक वर्षागणिक नवी भरही पडत असल्याचे दिसून येते.