For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपयश कधीपर्यंत झाकून ठेवणार?

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
अपयश कधीपर्यंत झाकून ठेवणार
Advertisement

दिल्लीत बसमधील बलात्कार प्रकरण : राहुल गांधींचा सरकारला सवाल

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

दिल्ली-एनसीआरमध्ये स्लीपर बसच्या आत  अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसोबत दिल्ली तसेच उत्तर प्रदेश सरकारवर मंगळवारी निशाणा साधला. अनेक किलोमीटरच्या प्रवासादरम्यान बसला कुठल्याही तपासणी नाक्यावर का रोखण्यात आले नाही असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये महिलांच्या सुरक्षेवरून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रेटर नोएडपासून दिल्लीपर्यंत बसने नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवे, दिल्लीचा रिंग रोड आणि सीमाक्षेत्र पार केले, परंतु बसची कुठेच तपासणी झाली नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.

Advertisement

बसमध्ये पडदे का?

स्लीपर बसच्या सीटच्या चहुबाजूला पडदे लावण्यात आले असताना आत काय सुरू आहे हे बाहेरून दिसत नव्हते. 2012 च्या निर्भरा प्रकरणानंतर स्लीपर बसची तपासणी अन् चौकशीशी निगडित नियमांचे पालन का होत नाही? बसचे पडदे केवळ त्या घटनेला लपविण्यापुरती मर्यादित नव्हते, तर हे प्रशासनाच्या कथित अपयशावर सरकारकडून पडदा टाकण्याचे प्रतीक देखील आहेत असे म्हणत राहुल गांधी यांनी दिल्ली पोलीस आणि उत्तरप्रदेश पोलिसांच्या उत्तरदायित्वावर प्रश्न उपस्थित केले.

उत्तरदायित्व निश्चित होणार का?

याप्रकरणी दिल्ली पोलीस आणि उत्तरप्रदेश पोलिसांचे उत्तरदायित्व निश्चित होणार की नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे. महिला आणि मुलींना सुरक्षित प्रवास उपलब्ध करविण्यासाठी व्यवस्थेत सुधार आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी उत्तरदायित्व निश्चित करत स्लीपर बसची तपासणी अन् देखरेखी निगडित नियमांना प्रभावीपणे लागू करावेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आयोगाने घेतली दखल

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बसमधील बलात्कार प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे. तर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. या घटनेला राहुल गांधी यांनी महिलांची सुरक्षा आणि प्रशासकीय देखरेखीशी जोडत सरकारांचे उत्तरदायित्व निश्चित करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Advertisement
Tags :

.