For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुंडलिनी जागृत कशी होते?

06:39 AM May 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
कुंडलिनी जागृत कशी होते
Advertisement

भगवंत म्हणाले, योगाभ्यासास सुरवात करण्यापूर्वी दर्भावर कृष्णाजीन घालून त्यावर बसावे आणि मन एकाग्र करून, सद्गुरुंच्या स्मरणाने अंत:करण स्थिर करावे. शरीर स्थिर ठेऊन, नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टि लावली की, अनुभवाचा उदय होऊ लागतो. इच्छा आणि अपेक्षा संपल्याने समाधी लागते. आधारचक्रावर मूळबंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपान वायु आतल्याआत संकुचित होऊ लागतो. दृष्टी अर्धोंमिलित होते. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणाऱ्या योग्याने शांत अंत:करणाने, भीतीरहित होऊन, माझ्या ठिकाणी चित्त ठेवून, फक्त माझा विचार करत संयमी मनाने आसनावर बसावे. ह्या अर्थाचा

Advertisement

शांत निर्भय मच्चित्त ब्रम्हचर्य-व्रती स्थिर । मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ।। 14 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, सद्गुरूंचे स्मरण करून झाल्यावर, चित्त व इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन करून योगाभ्यासाला सुरवात करावी. हे उत्तम जमू लागले की, त्याचा परिणाम होऊन उडीयनबंध साधला जातो. तो बेंबीवर पुष्ट होतो, पोट खपाटीला जाते आणि हृदयकमल प्रफुल्लित होते. शिश्नावरील काठास व बेंबीच्या खालच्या भागास जो बंध पडतो त्याला उडीयनबंध असे म्हणतात. याप्रमाणे शरीराच्या बाहेरच्या बाजूला अभ्यासाची छाया पसरते आणि आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो. मनाची बाह्य विषयांकडे धाव थांबते व सहजच मन शांत होते. भूक, झोप कोठे गेली, हे कळतही नाही. मूलबंधात कोंडला गेलेला अपानवायू ऊर्ध्वगतीने माघारा फिरतो आणि अडवला गेल्यामुळे फुगवटा धरतो. खवळलेला अपानवायु मस्त होतो व पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो. तेथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो. त्यामुळे सर्व शरीरातील पोटातील कुजकी घाण बाहेर पडते. त्या अपानवायूला आत वळण्याला कोठे जागा नसल्यामुळे, तो मग कोठ्यात प्रवेश करतो व तेथे असलेल्या कफ आणि पित्त यांचा त्याच्यापुढे निभाव लागत नाही. मग तो सप्तधातूंचे समुद्र पालथे करतो, मेदाचे पर्वत फोडतो व हाडामधील मज्जा बाहेर काढतो. नाड्या खुल्या करतो, अवयव शिथील करतो व साधकाला भीती दाखवतो. परंतु त्याने भिऊ नये.

कोंडलेला अपानवायू रोगांना भीती दाखवून त्यांना लगेच नष्ट करतो आणि शरीरात जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकात एक कालवतो. दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागृत करते. केशराने न्हालेले नागाचे पिल्लु वेढे घेऊन निजावे त्याप्रमाणे नेमकी साडेतीन वेढ्याची ती कुंडलिनीरूपी नागीण खाली तोंड करून निजलेली आहे. ती नागीण विजेची बनवलेली गोलाकार कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची घडी अथवा उत्तम सोन्याचे चकचकित वळे कसे दिसते तशी दिसते. याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित होऊन नाभीजवळच्या संकुचित जागेत ती बसलेली असते. वज्रासनाने दाटून बसलेल्या चिमट्यामुळे ती जागी होते. जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्याने आपले आसन सोडून खाली यावे किंवा प्रकाशरूप बीजासच अंकुर फुटावा त्याप्रमाणे वेढे सोडून, कौतुकाने अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ति नाभीस्थानाखालील कंदावर उठलेली दिसते. आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते व तशात तिला जागे केल्याचे निमित्त होते. मग ती सरळ वरती तोंड पसरते आणि हृदयकोशाखाली जो वारा भरलेला असतो त्या सगळ्या वायूस ती खाऊन टाकते.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :

.