आयुष्य नेमके जगायचे कसे-‘फास्ट’ की ‘स्लो’?
जगण्याच्या बाबतीत माणूस इतका संभ्रमात कधीच नव्हता. नवतंत्रज्ञानामुळे आपले सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा त्याचा समज होता. पण आता कृत्रिम बुद्धिमत्ता ज्या वेगाने वाढते आहे त्यामुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य अक्षरश: पिंजून गेले आहे. जगण्याचा वेग अपरिहार्यपणे खूपच वाढला आहे.
अल्प काळात अचानक वाढलेल्या वेगाने माणसाच्या जगण्याचे गणित मात्र पार अवघड करून टाकले आहे. वेळेची प्रचंड बचत आणि पैशाची अनिवार्य गरज असे दोन टोकाचे ताणबिंदू निर्माण झाले आणि त्यात झुलत राहणारा माणूस गोंधळून गेलेला आहे. वाढलेल्या वेगाने आपल्या जीवनपद्धतीत जे अचानक बदल झाले त्यात आपली वस्तू होत गेली हे नक्कीच मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे हे एक आणि दुसरे म्हणजे आपल्या जगण्यातले जे निवांतपण होते ते संपले आहे.
आयुष्य आनंदात घालवायचे असेल तर वेगापेक्षा अपरिहार्यपणे निवांतपणाकडे जायला हवे. निवांतपण मग ते विचारातलेही आणि एकंदर जगण्यातलेही. वेगात अनेक गोष्टी तातडीने साधल्याचे सुख नक्की असेल पण निवांतपणात आपले माणूसपणाचे भान जपल्याचा आनंद आहे. वेगात एकटेच सगळे गाठल्याचे सुख असेल पण निवांतपणात सर्वंकष जगल्याचा आनंद आहे. आपल्याला काय हवे यापेक्षा काय महत्त्वाचे? वेगामुळे येणारी इर्षा की निवांतपणात असणारी जगण्याची प्रेरणा? याचे आत्मभान येणे गरजेचे आहे. तात्पर्य सतत वेगाने धावू करत आपण नेमके काय केले, या प्रश्नाभोवती आज माणसांचे आयुष्य रेंगाळते आहे. काही देशात घाईघाईने जगून, अनेक गोष्टी कमी वेळात करून सुद्धा जगण्यातला आनंद कसा मिळवायचा याच्या कोड्यांची उकल करण्यात समाजशास्त्रज्ञ गुंतले आहेत. जगभरात आता ‘स्लो लिव्हिंग’बद्दल बोललं जातंय. अनेकजण त्या वाटेवर चालूही लागलेत. अत्यंत माफक आणि पर्यावरणपूरक वस्तूंमध्ये अर्थपूर्ण जगणं, पर्यावरणाची काळजी घेणं, टिकाऊ विकासावर भर देणं हेही त्यात आलं. या चळवळीचा मुख्य हेतूच संथ आणि अर्थपूर्ण जगणं हा आहे. ही चळवळ जवळजवळ 150 देशात पसरली आहे. त्यानंतर ही चळवळ स्लो वर्किंग, स्लो प्रवास, स्लो पालकत्व अशा अनेक विभागात विस्तारली. या चळवळीचा मुख्य हेतू संथ आणि अर्थपूर्ण जगणं हा आहे. ‘लिव्ह बेटर नॉट फास्टर’ असं या चळवळीचं ब्रीद आहे. स्लो लाईफची सुरुवात 80 च्या दशकात इटलीमध्ये झाली आणि याला कारणीभूत होतं मॅकडोनाल्ड ही खाद्यपदार्थ विकणारी कंपनी. 1986 साली कार्लो पेट्रीनो नावाच्या इटालियन लेखकाने ही चळवळ सुरू केली. मॅकडोनाल्ड आणि तत्सम फूड चेन्समुळे स्थानिक पदार्थ, त्यांची वैशिट्यो, त्यांचं रोजच्या जगण्यातलं महत्त्व आणि त्यांच्या माणसांच्या जगण्याशी, विचार करण्याच्या पद्धतींशी, जीवनशैलीशी असलेला जवळचा संबंध या सगळ्यावर परिणाम होतो आहे असे तेथील बहुसंख्य लोकांना वाटले. फास्ट फूड या संकल्पनेला विरोध म्हणून कार्लो पेट्रीनो यांनी ‘स्लो फूड’ ही चळवळ सुरु केली. पण तो विचार अन्नापुरता मर्यादित राहिला नाही. आधुनिकीकरणाच्या झंझावातात जिथे जिथे म्हणून थोडं थांबण्याची, श्वास घेण्याची, स्वत:ला वेळ देण्याची गरज माणसांना वाटली त्या प्रत्येक क्षेत्रात हा विचार पोहचला. त्यातून स्लो लाईफ किंवा स्लो लिव्हिंग या विचाराचा परीघ तयार झाला. स्लो लिव्हिंगची सुरुवात अन्न पदार्थांपासून झाली असली तरी पुढे या संकल्पनेचा प्रवास आणि प्रसार करियर, प्रवास, फॅशन, शिक्षण, पालकत्व, तंत्रज्ञानाचा वापर अशा बहुतेक सगळ्या क्षेत्रात झाला आहे. पाठोपाठ 1990-2000 या दशकात स्लो सिटीज ही चळवळ सुरू झाली, जिथे शहरांनी स्वत:ला हळू, शांत, स्थानिक संस्कृती जपणारी, टिकाऊ जीवनशैली असलेली ठिकाणे म्हणून घडवण्यावर भर दिला गेला. 2004 मध्ये कार्लो होनोरे यांचे ‘इन प्रेज ऑफ स्लो लिव्हिंग’ हे पुस्तक प्रकाशित झाले. यात त्यांनी काम, प्रवास, अन्न, पालकत्व, शिक्षण, तंत्रज्ञान यामध्ये वेग कमी करण्याचे फायदे नमूद केले आणि या संपूर्ण विचाराला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. म्हणजेच 2010 नंतर, स्लो टेक, डिजिटल कमी करणे आणि माईंडफुल लिविंग सारख्या संकल्पना पुढे आल्या. स्लो लाईफ म्हणजे जाणीवपूर्वक, धीम्या गतीने आणि अर्थपूर्ण पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करणं. आपले ध्येय काय आहे याचा सतत विचार करण्यापेक्षा त्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचा आनंद घेणं. वर्तमानात असणं. आहे त्या क्षणाचा आनंद घेणं. सतत कशाच्यातरी मागे धावण्यापेक्षा, शांत आणि ठरवून जगण्यावर माणसं भर देऊ लागली आहेत. कुणी आवडीचा छंद जोपासत आहे तर कुणी आपली बकेट लिस्ट पूर्ण करत आहे. 12 तास काम केलं म्हणजे प्रत्येक जण उत्तम काम करेल असा विचार करणं घातकी आहे. उलट वेग कमी करुन ताण कमी होऊ शकतो आणि गुणवत्ता वाढू शकते.
-प्रा. डॉ. गिरीश नाईक, कोल्हापूर