अमेरिकेचा इराण हल्ला कितपत प्रभावी?
अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध अहवालांमुळे प्रश्न : वेळप्रसंगी पुन्हा हल्ला करण्याचीही ट्रम्प यांची तयारी
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेने इराणच्या अनेक अणुतळांवर हल्ले केले ही बाब खरी असली, तरी या हल्ल्यांमुळे इराणच्या अणुकार्यक्रमाची फारशी हानी झालेली नाही, असा दावा अमेरिकेच्याच काही वृत्तपत्रांमध्ये करण्यात आला आहे. पँटागॉन या अमेरिकेच्या संरक्षण संस्थेचा प्रतिपादनाचा संदर्भ देऊन हा दावा करण्यात आला आहे. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही वृत्ते पूर्णत: बनावट असून अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणचे अणुतळ पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत, असे प्रतिपादन केले आहे. याचदरम्यान इराणने अणुकार्यक्रम सुरू ठेवल्यास पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
अमेरिकेच्या बाँब्जमुळे इराणच्या अणुतळांचे किरकोळ नुकसान झाले. मात्र इराणने आपले संपृक्त युरेनियमचे साठे आधीच दुसऱ्या सुरक्षित तळांवर नेले होते. त्यामुळे अमेरिकेच्या हल्ले फारसे यशस्वी ठरले नाहीत. इराणची अण्वस्त्रे बनविण्याची क्षमता फारशी प्रभावित झालेली नाही. इराणकडे 400 किलो 90 टक्के संपृक्त युरेनियम असून ते 10 अणुबाँब बनविण्यासाठी पुरेसे आहे. हे युरेनियम सुरक्षित असून त्याचा उपयोग इराण करु शकतो, असा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्रांमध्ये करण्यात आला आहे. यासाठी उपग्रहीय छायाचित्रांचा आधार घेण्यात आला आहे. छायाचित्रांमध्ये इराणच्या अणुतळावर कंटेनर्सची रांग दिसत आहे. या कंटेनरमधून अमेरिकेच्या हल्ल्यांपूर्वीच युरेनियम दुसरीकडे हलविण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शंका निर्माण झाल्या असल्याचे बोलले जाते.
इस्रायलचा दुजोरा
तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या यशाच्या प्रतिपादनाला इस्रायलकडून दुजोरा देण्यात आला आहे. अमेरिकेचे हल्ले अचूक आणि प्रभावी होते. इराणची अणुबाँब बनविण्याची क्षमता त्यांच्यामुळे नष्ट झाली. आता अनेक वर्षे तो देश अणुबाँब बनवू शकणार नाही, असे प्रतिपादन बेंजामिन नेतान्याहू यांनी केले आहे.
...तर पुन्हा हल्ले करु!
आम्ही इराणची अणुबॉम्ब बनविण्याची क्षमता नष्ट केली आहे. मात्र, भविष्यात पुन्हा त्या देशाने अणुबॉम्ब बनविण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर याहीपेक्षा भीषण हल्ले केले जातील. कोणत्याही परिस्थितीत त्या देशाला अणुबॉम्ब बनवू दिला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.