सीलबंद क्लबला अग्निशामक परवाना कसा
चौकशी समितीला धाब्यावर बसवून कारनामा : अग्निशामक दलाच्या कारभाराचा पर्दाफाश
पणजी : हडफडे येथील बर्च नाईट क्लबला शनिवार 6 डिसेंबर रोजी आग लागून 25 जणांचे मृत्यू झाल्यानंतर या प्र्रकरणाच्या तपासासाठी सरकारने नियुक्त केलेल्या संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समितीने 13 डिसेंबर रोजी गंभीर नियम उल्लंघनासाठी वागातोर येथील ‘कॅफे सीओ2’ या नाईट क्लबला टाळे ठोकले होते. मात्र आश्चर्याची आणि तेवढीच संतापाची बाब म्हणजे अग्निशामक दलाने याच कॅफे सीओ 2 ला अवघ्या तीन दिवसातच म्हणजे 16 डिसेंबर रोजी अग्निसुरक्षा परवाना दिल्याची माहिती मिळाली आहे. हा परवाना कसा दिला? नंतर 19 डिसेंबर रोजी तो मागे का घेतला? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे अग्निशामक दलाच्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. हडफडे येथील बर्च नाईट क्लबमध्ये अग्नितांडव झाल्यापासून स्थानिक पंचायतीपासून सरकारच्या विविध खात्यांची लक्तरे वेशिवर टांगली जात आहेत. सतत टीकेचे लक्ष असणाऱ्या अग्निशामक दल या अग्नितांडवानंतरही सुधारलेले नाही, असे दिसते.
सीलबंद असताना पाहणी केली कशी?
एखाद्या आस्थापनाला अग्निसुरक्षा परवाना देण्याचे झाल्यास विविध सोपस्कार पूर्ण करतानाच त्या आस्थापनात प्रत्यक्ष जाऊन पहाणी करणे बंधनकारक आहे. हा नियम लक्षात घेतल्यास ‘कॅफे सीओ 2’ या गंभीर नियमांच्या उल्लंघनप्रकरणी सीलबंद केलेल्या आस्थापनात अग्निशामक दलाचे अधिकारी पहाणी करण्यासाठी क्लबच्या आतमध्ये कसे गेले? की पहाणी न करताच परवाना देण्यात आला?
अधिकाऱ्यांनी क्लबचा सील तोडला काय?
सीलबंद असलेल्या ‘कॅफे सीओ 2’ क्लबची प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी जर अग्निशामक अधिकारी क्लबमध्ये गेले असतील, तर त्यांनी संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समितीने क्लबला ठोकलेला सील तोडला काय? सील तोडला असल्यास तोही मोठा गुन्हा आहे. पाहणी न करताच परवाना दिला असेल तर तोही गुन्हाच ठरतो. यात काही लाचलुचपत घेण्याचा प्रकार असू शकतो. पुन्हा तोही मोठा गुन्हाच आहे.
मुक्तिदिनी परवाना का घेतला मागे?
19 डिसेंबर हा गोवा मुक्तिदिन असून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असताना परवाना मागे घेण्याएवढी घाई का झाली होती? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अग्निसुरक्षा परवाना देताना मोठ्या प्रमाणात घोळ होतो, असे अनेकजण बोलत असतात, मात्र आता ते प्रत्यक्षात उघड झाले आहे. सरकारने स्थापन केलेल्या संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समितीने तुम्ही सुरक्षा उपायांचे पालन न केल्याबद्दल तुमचा परिसर सील केला आहे. म्हणूनच, सार्वजनिक सुरक्षेच्या हितासाठी 16 डिसेंबर रोजी जारी केलेला ना हरकत दाखला तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे, असे अग्निशामक दलाने 19 डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. गंभीर सुरक्षा त्रुटींमुळे बंद केलेल्या आस्थापनला अग्निशमन परवानगी किती लवकर देण्यात आली हे अहवालात उघड झाल्यानंतर घबराट पसरली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा परिणाम रोखण्यासाठी आणि जारी केलेल्या मंजुरींचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठका घेतल्याचे वृत्त आहे.
अशी आहे अग्निशामक परवाना मिळविण्याची प्रक्रिया
- अग्निशमन परवानगी प्रमाणपत्र मिळवणे या प्रक्रियेस सामान्यत: किमान एक आठवडा लागतो.
- अर्जदाराने ऑनलाइन अर्ज करावा लागतो आणि नंतर संपूर्ण भौगोलिक फाइल सादर करावी लागते.
- त्यानंतर आस्थापनाची प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक आहे.
- तपासणीत जर काही कमतरता आढळल्या तर त्यांची पूर्तता करण्यास सांगितले जाते.
- त्यानंतर दुसरी तपासणी केली जाते.
- सर्व आवश्यकता पूर्ण झाल्यानंतरच अग्निसुरक्षा परवाना जारी केला जातो. मात्र कॅफे सीओ2 या नाईट क्लबला तो सीलबंद असताना परवाना देण्याच्या या प्रकाराने अग्निशामक दलाच्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.