नापास व्यक्ती पंतप्रधान कशी होते?
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानाने वादंग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जी व्यक्ती शिक्षणात दोनदा अनुत्तीर्ण झाली आहे, ती देशाच्या सर्वोच्च पदी कशी येऊ शकते, या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामुळे राजकारणात मोठेच वादंग माजले आहे. हे विधान त्यांनी राजीव गांधी यांच्या संदर्भात केले आहे. भारतीय जनता पक्षाने यासंदर्भात काँग्रेसकडे स्पष्टीकरण मागितले असून दोन्ही पक्षात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.
राजीव गांधी यांच्यासह मी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले होते. ते तेथे एकदा अनुत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इंपिरिअर महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण तेथेही ते एकदा नापास झाले. नंतर ते विमानचालक बनले. जेव्हा 1984 मध्ये ते भारताचे सर्वोच्च नेते बनले, तेव्हा माझ्या मनात प्रमुख विचार हाच आला, की जी व्यक्ती तिच्या शिक्षणक्रमात दोनदा नापास झाली आहे, ती अशा उच्च पदावर कशी येऊ शकते ? केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थी अनुत्तीर्ण किंवा नापास होणे जवळपास अशक्य असते. कारण या विद्यापीठाचा कल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याकडे असतो. असे असूनही राजीव गांधी दोनदा अनुत्तीर्ण झाले होते, असा धमका मणिशंकर अय्यर यांनी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हे काय प्रकरण आहे, अशी विचारणा होत आहे.
10 वर्षे भेट नाही
मी काँग्रेसचा नेता असूनही सोनिया गांधी यांची मला 10 वर्षे भेट घेऊ देण्यात आली नव्हती. मी केवळ एकदाच राहुल गांधी यांना प्रत्यक्ष भेटलो आहे. तसेच प्रियांका गांधी यांची आणि माझी थेट भेट केवळ दोनदा झाली आहे. त्यांच्याशी मी दूरध्वनीवरुन संपर्कात काहीवेळा असतो. मात्र, गांधी कुटुंबातील या तीन्ही मोठ्या व्यक्तींशी फार कमी वेळा मला संपर्काची संधी मिळते. अशा प्रकारे गांधी कुटुंबानेच माझे राजकीय भवितव्य घडवले आणि याच कुटुंबाने ते बिघडविले, असे सनसनाटी आरोप मणिशंकर अय्यर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
गांधी घराण्याचे एकनिष्ठ
मणिशंकर अय्यर हे गांधी घराण्याचे एकनिष्ठ मानले जातात. त्यांनी आजवर कधीही या घराण्यातील कोणावरही जाहीर टीका केलेली नाही. मात्र बुधवारी त्यांनी एका व्हिडीओद्वारे गांधी कुटुंबावर हल्लाबोल केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय जनता पक्षाच्या हाती त्यामुळे आयते कोलीत मिळाल्याचे दिसून येते. या पक्षाने काँग्रेसवर यासंबंधी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
राजीव गांधी यांच्या क्षमतेवर शंका
राजीव गांधी यांचे शैक्षणिक करिअर विशेष चांगले नव्हते. ते काहीवेळा अनुत्तीर्ण झाल्याने त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा व्यक्तीला देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त केल्याने शंका निर्माण होतात, अशा शब्दांमध्ये अय्यर यांनी त्यांचे वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटले असून त्यांनी आत्ताच गांधी कुटुंबासंदर्भात अशी विधाने का केली, अशी चर्चा केली जात आहे.
अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मणिशंकर अय्यर यांनी अनेक वादग्रस्त विधाने गतकाळात केली आहेत. नीच किस्म का आदमी, चायवाला इत्यादी शब्द त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून उपयोगात आणल्याने काँग्रेसची अनेकदा कोंडी झाली आहे. 2017 मध्ये त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही असे वादग्रस्त विधान केल्याने काँग्रेसला ती निवडणूक गमवावी लागली होती. त्यानंतर 2019 पर्यंत अय्यर यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळातही त्यांनी असेच बेताल विधान केल्याने काँग्रेसला फटका बसला होता, असे दिसून येते.