For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वच्छता कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिकविना वेतन कसे देता?

01:10 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वच्छता कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिकविना वेतन कसे देता
Advertisement

मनपा आरोग्य स्थायी समिती बैठकीत प्रश्न उपस्थित : विविध विषयांवर चर्चा, अनेक ठराव मंजूर, अधिकाऱ्यांना धारेवर धरून कडक शब्दात सूचना

Advertisement

बेळगाव : स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन 7 महिन्यांपासून बायोमेट्रिकविना कोणत्या आधारे देत आहात. सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक का घेत नाही?. यापुढे सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी रजिस्टरद्वारे न घेता बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात यावी. शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने कचऱ्याची उचल करण्याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना महापालिकेच्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा लक्ष्मी राठोड, अॅड. हणमंत कोंगाली, नितीन जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांना कडक शब्दात सूचना दिल्या.

बैठकीच्या प्रारंभी बैठकीची अजेंडा कॉपी केवळ कन्नडमधून देण्यात आल्याने नगरसेवक मोदीनसाब मतवाले यांनी आक्षेप घेतला. कन्नडप्रमाणे इंग्रजीमध्येही अजेंडा कॉपी का देण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सचिव प्रियांका यांनी राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे सरकारी कार्यालयात केवळ कन्नड कागदपत्रे पुरविण्यात येत असल्याचे सांगितले. यावर मोदीनसाब मतवाले यांनी कन्नडसह इंग्रजी भाषेतही कागदपत्रे व अजेंडा कॉपी देण्याची मागणी केली. यावर प्रियांका यांनी पुढील बैठकीत इंग्रजीमध्ये अजेंडा कॉपी देण्याचे आश्वासन दिले.

Advertisement

0 ते 6, 7 ते 13 वयोगटातील मुलांना महापालिकेकडून आरोग्य विमा पुरविण्यात येणार आहे. शासनाकडून 11 मुलांसाठी निधीची तरतूद केली आहे. विमासाठी 45 अर्ज आले होते. मात्र महापौरांनी कन्नड, मराठी, ऊर्दू सरकारी व अनुदानित शाळेतील मुले, आई किंवा वडील नसलेली मुले व गुणवंत विद्यार्थ्यांना प्राध्यान्य देण्याची सूचना दिली होती. त्यानुसार अर्जांची पडताळणी करून मुलांची निवड करण्यात आल्याचे प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी आऊटसोर्सिंग निविदा प्रक्रिया सुरू असून दोन कंपन्यांनी निविदा पाठवून दिली आहे.

यापूर्वी 38 हजार 200 दर देण्यात आला होता. आता 34 हजार 100 रुपयांचा दर कंपन्यांकडून देण्यात आला आहे. कमी दरामुळे महापालिकेवरील ताणही कमी होणार असल्याचेही तळवार यांनी सांगितले. लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याला अंतिम रुप देण्याची सूचना बैठकीतून देण्यात आली. वेळोवेळी कचऱ्याची उचल करण्यात येत नसल्याची तक्रार नगरसेवक नितीन जाधव यांनी केली. तसेच कचरा वाहून नेण्यासाठी तैनात असलेल्या गाड्यांची संख्या कमी असल्याने कचऱ्याची उचल होत नाही.

काही वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागत आहे. वाहने कमी असल्याने याचा फटका नागरिकांना बसत असून आपल्या वॉर्डात कचरा उचल करणारी वाहने येत नसल्याचे त्यांनी सांगितले. जेवढी वाहने आहेत, त्या संख्येनुसार कचऱ्याची उचल करण्यात येत आहे. लवकरच नवी वाहने दाखल होणार असून ही समस्या निकाली निघेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

धोकादायक झाडे-फांद्या हटविण्यासाठी टास्क फोर्स

शहरात अनेक ठिकाणी धोकादायक झाडे आहेत. ज्याठिकाणी धोका अधिक आहे. त्याठिकाणच्या झाडांच्या फांद्या काढण्यासाठी उपाययोजना राबवा, असा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला होता. याकामासाठी दोन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून यामध्ये विविध विभागातील 6 जणांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर टास्क फोर्स शहर परिसरात फेरफटका मारून धोकादायक झाडांचा शोध घेऊन फांद्या किंवा झाडे काढण्याचे काम करणार आहे. यासाठी लागणारे साहित्य महापालिकेकडून पुरविण्यात येणार आहे.

पत्रकारांच्या आरोग्याचा विचार करून महापालिकेकडून पत्रकारांना आरोग्य विमा पुरविण्यात येतो. काही दिवसांपूर्वी पत्रकार संघटनेच्यावतीने ही योजना कायम ठेवून आरोग्य विम्याच्या निधीमध्ये वाढ करण्याच्या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार पत्रकारांची यादी मागविण्यात येणार असून यापुढे आरोग्य विमा योजना कायम ठेवण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीनुसार निधी वाढविण्याचाही ठराव संमत करण्यात आला. यावेळी सदस्य अॅड. हणमंत कोंगाली, मोदीनसाब मतवाले, अभिजित जवळकर, चिक्कदिन्नी रुपा, वैशाली भातकांडे, प्रीती कामकार, कौंन्सिल सेक्रेटरी प्रियांका, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शहर स्वच्छ ठेवण्याची सूचना

काही ठिकाणी खुल्या जागेत कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असून यासाठी खुल्या जागा असणाऱ्या जमीन मालकांना नोटीस जारी करून त्याठिकाणी कचरा टाकण्यात येऊ नये, अशी व्यवस्था करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यावर स्वच्छता विभागाने आपल्याकडे खुल्या जागा मालकांची माहिती नसून आपल्याला माहिती दिल्यास नोटीस बजावू, असे आश्वासन दिले. बैठकीत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी समन्वयातून काम करण्याची सूचना देण्यात आली.

Advertisement
Tags :

.