मुख्य निवडणूक आयुक्तांना कसे हटविता येते?
गोव्यासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यासाठी होणाऱ्या आंदोलनांमध्ये हिंदुत्वाला राजकारणात ओढत हिंदुत्व मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एकंदरीत गोव्यासह देशभरात अराजकता माजविण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त जर खरेच दोषी असतील तर त्यांना त्या पदावरुन हटविण्यासाठी ज्या संविधानाने हा देश चालत आला आहे, त्या संविधानात काहीच तरतूद नाही?
विरोधकांच्या म्हणण्यानुसार ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन’ (एसआयआर) म्हणजे विशेष व्यापक उजळणी अभियानाद्वारे अनेकांची मतदार म्हणून असलेली नोंदणी रद्द करण्यात आली. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (इव्हीएम) द्वारे मतदान घेऊन सत्ताधारी भाजपला लाभ मिळवून देण्यात आला. ज्याला विरोधक ‘वोट चोरी’ म्हणतात. या दोन्ही आरोपांना ज्ञानेश कुमार जबाबदार असल्याचा त्यांचा दावा आहे. पहिल्या आरोपाबाबत असे दिसून आले आहे की काही मृत मतदारांची नावे, काहीची दोन ठिकाणी असलेली नावे, काही दुसऱ्या देशातून येऊन भारतात बेकायदेशीरपणे राहून मतदार म्हणून नेंदली गेलेली नावे रद्द करण्यात आली आहेत. काही मतदार हयात असूनही त्यांची नावे रद्द झालेली आहेत, कारण ते मतदार ब्लॉक लेवल ऑफिसरना (बीएलओ) मतदाराच्या निवासस्थानी भेटले नाहीत, अशांचीही नावे रद्द झाली आहेत. त्यापैकी काही नावे आता पुन्हा मतदारयादीत नोंदविण्याची प्रक्रिया गोव्यासह देशभरात सुरु झाली आहेत. गोव्यात 98 नावे पुन्हा मतदारयादीत नोंदविण्यात येणार आहेत. इव्हीएम आणि वोट चोरी या आरोपाबाबत विरोधकांमध्ये विरोधाभास आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘वोट चोरी’बाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. मी जिंकल्यानंतर आनंदोत्सव करायचा आणि दुसरे जिंकल्यानंतर ‘वोट चोरी’ म्हणत कांगावा करायचा, हा प्रकार कधीच समर्थनीय होऊ शकत नाही.
भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यायला हवा काय? मागणी केली म्हणून कोण राजीनामा देतो काय? आपण का म्हणून राजीनामा द्यावा? असा प्रतिप्रश्नही विचारला जाऊ शकतो. मुळात भारतीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कशी होते? ते राजीनामा देऊ शकतात काय? त्यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांना त्या पदावरुन हटविले जाऊ शकत नाही काय? भारतीय मुख्य निडणूक आयुक्तांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. त्यापूर्वीची प्रक्रिया मात्र खूप गंभीर्याची आहे. हे पद भरण्यासाठी पहिली पायरी म्हणजे शोध समिती. केंद्रीय कायदामंत्री किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव यांच्यापैकी कुणाही एकट्याच्या अध्यक्षतेखाली ही शोध समिती स्थापन केली जाते. ही समिती या पदासाठी पात्र असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची यादी बनवून निवड समितीकडे सादर करते.
दुसरी पायरी म्हणजे निवड समिती. ही तीन सदस्यांची असते. प्रधानमंत्री अध्यक्ष असतात. पंतप्रधानांनी नियुक्त केलेले कोणतेही एक केंद्रीय मंत्री या समितीचे दुसरे सदस्य असतात, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते किंवा लोकसभेतील सर्वांधिक मोठ्या पक्षाचे नेते यांच्यापैकी एक व्यक्ती या समितीचा तिसरा सदस्य असतो. शोध समितीने पाठविलेल्या नावांच्या यादीतील एक नाव अंतिम ठरविते आणि ते राष्ट्रपतींकडे पाठवते. तिसऱ्या पायरीत निवड समितीने राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या व्यक्तीच्या नावावर राष्ट्रपती शिक्कामोर्तब करतात आणि त्या व्यक्तीच्या भारतीय मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीचा आदेश जारी करतात.
विद्यमान परिस्थितीत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. भारतीय संविधानानुसार कोणत्याही पदावरील व्यक्ती राजीनामा देऊ शकते. आरोग्यदृष्ट्या अयोग्य, मानसिकदृष्ट्या अयोग्य किंवा त्यांच्या मनाप्रमाणे ते कधीही राजीनामा देऊ शकतात. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यामागे जी कारणे सांगितली जातात ती भारतीय लोकशाही अभ्यासक, संवैधानिक अभ्यासक, पत्रकार, राजकीय पक्ष, राजकीय विश्लेषक तसेच जनतेला राजकीय तसेच दुटप्पीपणाची वाटतात. वास्तविक परिस्थिती काहीही असली तरी भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त जर राजीनाम्याची मागणी होऊनही राजीनामा देत नसतील तर काय करावे? रस्ते अडवून जनतेला वेठीस धरावे? अराजकतेची परिस्थिती निर्माण करावी? संवैधानिक संस्थेची बदनामी करावी? लोकशाही मूल्यांवरील विश्वास उडण्यासारखी परिस्थिती निर्माण करावी? भारतीय मुख्य निवडणूक आयुक्तांना हटविण्यासाठी भारतीय संविधानात तरतूद नाही काय?
भारतीय संविधानाच्या 324 कलमानुसार भारतीय मुख्य निडणूक आयुक्तांना त्या पदावरुन हटविता येते. मात्र त्यासाठीची प्रक्रिया खूप गांभीर्याची आहे, तिथे पोरकटपणाला कुठेही वाव नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांना हटविण्याच्या प्रक्रियेला ‘महाभियोग’ (इम्पिचमॅन्ट) असे संविधानात संबोधिले आहे. गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता या दोनच कारणांवरुन महाभियोग चालविता येतो. तिथे काल्पनीक, संशयात्मक, द्वेषात्मक किंवा अन्य कसल्याही कारणांना वाव नाही. महाभियोगाच्या पहिल्या टप्प्यात महाभियोगाच्या प्रस्तावाची नोटीस संसदेच्या कोणत्याही सभागृहात द्यावी लागते. लोकसभेत दिल्यास 100 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आणि राज्यसभेत दिल्यास 50 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नोटीशीवर असणे आवश्यक आहे. ही नोटीस सभापतींना सादर करायची असते. हा प्रस्ताव स्विकारावा की नाही, याबाबतचा संपूर्ण अधिकार सभापतींना असल्याने ते प्रस्ताव स्विकारु शकतात आणि फेटाळूही शकतात. सभापतींनी प्रस्ताव स्विकारल्यास तो तीन सदस्यीय चौकशी समितीकडे पाठविला जातो. समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश, देशातील कोणत्याही उच्च न्यायालयाचे एक मुख्य न्यायाधीश, देशातील एक नामांकित कायदेतज्ञ असे तीन सदस्य असतात.
समितीकडून चौकशीवेळी मुख्य निवडणूक आयुक्तांना बाजू मांडण्याची संधी दिली जाते. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास समिती आपला सविस्तर अहवाल संसदेकडे पाठवते. समितीच्या अहवालावरुन लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे मतदान घेतले जाते. विशेष बहुमताने म्हणजे उपस्थित असलेल्या दोन तृतियांश सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले तरच प्रस्ताव मंजूर होतो. संसदेत मंजूर झाल्यानंतर प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविला जातो आणि त्यांच्या मंजूरीनंतरच भारतीय निवडणूक मुख्य आयुक्तांना पदावरुन हटविण्याचा महाभियोग पूर्ण होतो. संविधनाचा मान राखायला हवा असेल, तर ज्ञानेश कुमार यांना हटविण्यासाठी हा महाभियोग चालवता येतो.
राजू भिकारो नाईक
