येमेन-सौदी अरेबियावर हुथी बंडखोरांचा हल्ला
58 येमेनी सैनिक ठार, 11 जखमी, विविध भागात अग्नितांडव
वृत्तसंस्था
रियाध
इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी गुरुवारी रात्री सौदी अरेबिया आणि येमेनमध्ये एकाचवेळी मोठे हल्ले केले. पहिल्या हल्ल्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs आणि ड्रोनद्वारे येमेनी सरकारच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 58 सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमीही आहेत. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या येमेनच्या संरक्षण मंत्रालयाने योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगितले. दुसरा हल्ला सौदी अरेबियातील नजरान येथे झाला, ज्यात 11 नागरिक जखमी झाले. यामध्ये सात सौदी, एक येमेनी, दोन इजिप्शियन आणि एका पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता. एक 4 वर्षांचे मूलही जखमी झाले. या हल्ल्यांनंतर नजरानच्या अनेक भागांमध्ये आगीचा भडका उडाल्याने लोकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.
येमेनच्या हुथी बंडखोरांचे हे ताजे हल्ले केवळ तेथील गृहयुद्धापुरते मर्यादित नाहीत. इराण आणि अमेरिका व इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे हुथी आपले हल्ले अधिक तीव्र करत आहेत. याचे कारण इराण आणि हुथी यांच्यातील दीर्घकालीन संबंध आहेत. हुथी (अन्सार अल्लाह) हा येमेनमधील एक शिया बंडखोर गट आहे. 2014 मध्ये त्यांनी राजधानी सनावर कब्जा केल्यापासून ते येमेनी सरकार आणि सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीविरुद्ध लढत आहेत.
इराण हुथींना शस्त्रs, ड्रोन आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुरवतो, असा अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांचा आरोप आहे. जेव्हा अमेरिका किंवा इस्रायल इराणवर लष्करी दबाव वाढवतात, तेव्हा हुथी आपले हल्ले तीव्र करतात. याचा उद्देश प्रतिस्पर्धी देशांना एकाचवेळी अनेक आघाड्यांवर गुंतवून ठेवणे आणि इराणवरील दबाव कमी करणे हा आहे.
सौदी अरेबियाच्या नजरान प्रदेशात भीषण आग
सौदी अरेबियाच्या नजरान प्रदेशात गुरुवारी भीषण आग लागली असून, दूरवरच्या प्रदेशातूनही आगीच्या ज्वाला आणि धूर दिसत होता. सध्या आगीचे कारण किंवा नुकसानीच्या व्याप्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. नजरानमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन आणि मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.