For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येमेनजवळ हुथी बंडखोरांचा भारतीय जहाजावर हल्ला

06:18 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
येमेनजवळ हुथी बंडखोरांचा भारतीय जहाजावर हल्ला
Advertisement

सर्व 13 भारतीय नागरिक सुरक्षित : स्फोटकांनी भरलेल्या आत्मघाती बोटीची जहाजाला धडक, जहाज बुडाले

Advertisement

► वृत्तसंस्था

नवी दिल्ली, रियाध

Advertisement

येमेनच्या किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला आहे. हा हल्ला इराणशी संलग्न असलेल्या हुथी बंडखोरांनी केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटकांनी भरलेल्या एका आत्मघाती बोटीची जहाजाला धडक बसल्याने ते बुडाले. तथापि, जहाजावरील सर्व 13 भारतीय नागरिकांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एमएसव्ही ‘फैज नूर-ए-औलिया’ या जहाजावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

येमेनच्या किनाऱ्याजवळ लाल समुद्रात घडलेल्या घटनेनंतर 13 भारतीयांसह जहाजावरील सर्व 14 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. या हल्ल्यामागे हुथींचा हात होता. येमेनी सरकारशी संलग्न असलेल्या एनआरएफने हा हल्ला हुथी बंडखोरांनी केल्याचा दावा केला आहे. तथापि, हुथी बंडखोरांच्या अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे. हुथींना इराणचा पाठिंबा आहे. ही संघटना इराणी पैसा आणि शस्त्रांवर चालते. अमेरिकेचा हा एक प्रमुख शत्रू मानला जातो. हुथी सातत्याने शहरे, बंदरे आणि जहाजांना लक्ष्य करत असून, त्यामुळे प्रादेशिक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होत आहे. येमेनने सागरी सुरक्षेसाठी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय सागरी संरक्षण आघाडी आणि येमेनी सरकारला भक्कम पाठिंबा देण्याच्या गरजेवरही भर दिला.

येमेनकडून निषेध

येमेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने लाल समुद्रात हुथी दहशतवाद्यांनी भारतीय मालवाहू जहाज ‘फैज नूर-ए-औलिया’वर केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. स्फोटकांनी भरलेल्या बोटीने केलेल्या या हल्ल्यात जहाज पूर्णपणे बुडाले. हा हल्ला आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे गंभीर उल्लंघन असून, त्यामुळे तांबडा समुद्र, बाब-अल-मंदेब आणि एडनच्या आखातातील सागरी सुरक्षा व जागतिक व्यापाराला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे येमेनने म्हटले आहे.

14 खलाशांचे यशस्वी बचावकार्य

येमेनी तटरक्षक दल आणि नौदलाने संयुक्त कारवाई करून जहाजावरील 13 भारतीयांसह सर्व 14 कर्मचाऱ्यांना मोखा बंदरात सुरक्षितपणे पोहोचवले. येमेनने भारतासोबत एकजूट व्यक्त केली असून, आपण भारतीय अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहोत आणि कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहोत, असे म्हटले आहे. येमेनमधील भारतीय दूतावासाचे निवेदन जारी करत जहाजावरील सर्व 13 भारतीय कर्मचाऱ्यांना येमेनी अधिकाऱ्यांच्या मदतीने सुखरूप वाचवल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय दूतावास कर्मचारी सध्या खलाशांचे कुटुंबीय आणि येमेनी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या भारतात सुरक्षित परत येण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.