Sangli Corporation | सणासुदीच्या तोंडावर सांगलीत घरपट्टीचा भडका; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर उठले प्रश्न
सांगली : सांगली शहर तथा महापालिका क्षेत्रात प्रशासक व नवीन सत्ताधारी-विरोधी पक्ष निवडून आल्यावर ज्या घटना घडत आहेत, त्या कदाचित या आधी घडल्या नसाव्यात, इतके असंवेदनशील लोकप्रतिनिधी या आधी निदर्शनास आले नाहीत आणि नक्कीच हे पुढं दीर्घकाळ लक्षात राहतील. अशा शब्दात व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी महापालिकेतील सत्ताधारी विरोधक आणि प्रशासन यांच्या कारभाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
तसं सगळंच मनमानी आहे, पण ते सहन करत पुढं मार्गक्रमण सुरू होतं, मागे प्रशासक असताना आणि आता अधिकृत आयुक्त नेमणूक व नवीन नगरसेवक व जेष्ठ लोकप्रतिनिधी विद्यमान झाल्यावर करवाढ, बाढीव घरपट्टी तीही चुकीच्या पद्धतीने व नियमबाह्य अशी रेटून लागू केली, अनेक निवेदने, भेटी झाल्या, कसं अन्यायी आहे हे टाहो फोडून सांगितलं, अद्यापही सांगतोय, निषेध म्हणून एक दिवस कडकडीत बंद पाळाला, हजारो लोक रस्त्यावर येऊन आक्रोश करतात, राग व्यक्त करतात पण इकडे प्रशासनात काहीही हालचाल होत नाही?,लोकांच्या मतावर निवडून आलेलेनगरसेवक, आमदार, खासदार साधी विचारपूस करत नाहीत? आणि आयुक्त व इतर अधिकारी अश्या अविर्भावात आहेत जसे की जनता गुलाम आहे? जर प्रशासन योग्य करवाढ करत आहे, कायदेशीरकरत आहे.
तर समितीत आंदोलन करणारे, व इतर समाज घटक का सामील करून घेत नाही? सगळे समिती सदस्य प्रशासनातील का घेतले?क्षेत्रफळ मोजणी पद्धत, कर लावायची पद्धत, राज्य सरकार चे आदेश, सर्वोच्च न्यायालयाने केलेले आदेश व नगरविकास खात्याने केलेले आदेश सगळे केराच्या टोपलीत टाकून मोकळे झाले. व्यापारी व नागरिकांत फूट पाडून हे सगळं रेटून पुढं न्ह्यायचं अघोरी कृत्य सगळे मिळून व सगळे लाभार्थी होऊन करत आहेत, असं स्पष्ट चित्र समोर आहे.
या सगळ्या प्रशासनाच्या वागणुकीतून, लोकप्रतिनिधी मुद्दाम करत असलेलं दुर्लक्ष, पालक-चालक प्रशासनास देत असलेलं बळ-अनुमोदन हे लोकांत मोठा असंतोष व राग निर्माण करणारे आहे, अन्याय व जबरदस्तीने वसुली केली जातेय ही भावना निर्माण होणारी आहे. आयुक्तांच्या भयंकर मोठ्या दबावाखाली लोकप्रतिनिधी काहीही बोलायला तयार नाहीत.
प्रशासन अधिकारी आणि नेते कोणीच इथं ताम्रपट घेऊन आलेलं नाही, तुलनेत जनता कायम इथंच आहे, याचं माफक भान तरी ठेवा, त्यामुळे हे सगळं घडताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, नेते मंडळी मग सत्ताधारी किंवा बिरोधक सगळेचमौन आहेत, हे नुसतं दुर्दैवी नाही तर घातकी आहे, कदाचित तुम्ही लोक ही करवाढ रेटून दबाब टाकून, फूट पाडून, कारवाईची धमकी देऊन लागूही कराल, पण लोक तुमचं हे कृत्य व तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाहीत, फुगवून वाढवलेला कर भरायला सूट आणि अभय योजना देताय ही फूट लोकांना समजली आहे, आता सगळं स्थगित कराल, चर्चा कराल, सुधारणा कराल ही अपेक्षा आम्ही सोडून देत आहोत, सत्तेपुढे जनता लाचार होईल ही तुमची इच्छा पूर्ण होईल, पण विस्मरण होईल ही अपेक्षा ठेवू नका असे समीर शहा यांनी म्हटले आहे.