नंदिहळ्ळीत कडीकोयंडा तोडून सव्वापाच लाखांची घरफोडी
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. नंदिहळ्ळी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे सव्वापाच लाख रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. गुरुवारी दुपारी 12.30 ते 2.30 या दोन तासात चोरीची ही घटना घडली आहे. परशुराम यल्लाप्पा निडगलकर यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. गुरुवार दि. 8 मे रोजी दुपारी 12.30 वाजता आपल्या घराला कुलूप लावून ते शेताला गेले होते. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक आदित्य राजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे. तिजोरी व लॉकर फोडून 18 ग्रॅम 680 मिलीचा नेकलेस, 4 ग्रॅम 740 मिलीची चेन, 29 ग्रॅम 800 मिलीचे मंगळसूत्र असे एकूण 53 ग्रॅम 220 मिलीचे सोन्याचे दागिने, 21 ग्रॅम चांदी, 40 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 5 लाख 20 हजार 780 रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. शुक्रवार 9 मे रोजी यासंबंधी एफआयआर दाखल केला आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे.