For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन महिन्यात 44.70 कोटींची घरपट्टी वसूल

11:21 AM Jul 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
तीन महिन्यात 44 70 कोटींची घरपट्टी वसूल
Advertisement

5 टक्के सूट दिल्याचा परिणाम : यंदा 75 कोटी वसूल करण्याचे उद्दिष्ट 

Advertisement

बेळगाव : घरपट्टी भरण्यासाठी महापालिकेकडून आर्थिक वर्षात तीन महिने 5 टक्के सूट देण्यात आली होती. ही मुदत 30 जून रोजी संपली असून या तीन महिन्यात तब्बल 44 कोटी 70 लाख 13 हजार 28 रुपयांची घरपट्टी जमा झाली आहे. यंदाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक घरपट्टी जमा झाली असून महापालिकेने यंदा 75 कोटी रुपयांची घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या मिळकतधारकांकडून अधिक प्रमाणात घरपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बहुतांश जणांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपली घरपट्टी थकविली आहे.

थकीत घरपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न चालविले आहेत. दरवर्षी महापालिकेला एप्रिल महिन्यात घरपट्टी भरण्यासाठी सरकारकडून 5 टक्के सवलत देण्यात येते. पण यंदा बेंगळूर महापालिकेला 30 जूनपर्यंत 5 टक्के सवलत देण्यात आली. त्यामुळे बेळगाव महापालिकेकडूनही जून अखेरपर्यंत 5 टक्के सवलत देण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. त्यावर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 30 जूनपर्यंत 5 टक्के सवलत देण्यात आली.

Advertisement

मे महिन्यात पूर्ण घरपट्टी आकारण्यात आली. पण ही घरपट्टी पुढील वर्षी वजा करण्यात येणार आहे. सरकारने सुरू केलेल्या पंचहमी योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागत आहे. त्यामुळे घरपट्टीसह इतर महसूल वाढविण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. घरपट्टी वसुलीसाठी पथकांची स्थापना करून मोठ्या थकबाकीधारकांना नोटीस देण्यात आल्या आणि त्यांच्याकडून घरपट्टी वसूल करण्यात आली. सुरुवातीच्या तीन महिन्यांतच निम्म्यापेक्षा अधिक वसुली झाली आहे. आता 1 जुलैपासून घरपट्टीवर 2 टक्के दंड आकारला जात आहे.

चुकीची माहिती देऊन कमी घरपट्टी 

महापालिकेने स्वयंघोषित कर प्रणाली अवलंबली आहे. त्यामुळे लोकांना स्वत:च मालमत्तेचा आकार सांगून कर भरावा लागतो. पण बहुतांश जणांनी महापालिकेला चुकीची माहिती देऊन कमी घरपट्टी भरली जात आहे, अशा तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे मध्यंतरी महापालिकेच्या महसूल विभागाकडून शहरातील मालमत्तांच्या फेरमोजणीचे काम हाती घेण्यात आले होते. घरपट्टी भरण्यासाठी जून महिन्याची अखेरची मुदत होती. त्यामुळे लोकांनी घरपट्टी भरण्यासाठी अधिक पसंती दिली. जून महिन्यात तब्बल 5 कोटी 95 लाख 90 हजार इतकी घरपट्टी जमा झाली आहे.

Advertisement
Tags :

.