सिलिंडर स्फोटानंतर घर बेचिराख
साटेली भेडशी :
साटेली-भेडशी बाजारपेठेत मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सिलिंडरच्या झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घर बेचिराख झाले. अंकिता अर्जुन नाईक यांच्या मालकीचे हे घर होते. ही घटना साटेली-भेडशी परमे रोड प्राथमिक रुग्णालयाच्या मागील बाजूस घडली. या आगीत रोख रकमेसह घरातील सर्व सामान बेचिराख झाले.
अंकिता नाईक यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यातच घराला अचानक आग लागून नुकसान झाल्यामुळे नाईक कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. साटेली-भेडशी बाजारपेठेत सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास स्फोटाप्रमाणे मोठा आवाज झाला. त्याचक्षणी परमे रोडच्या दिशेने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूला असलेल्या एका घरातून धुरासह आगीचे लोळ येत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. बाजारपेठेतील व्यापारी, ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या घरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. कसई दोडामार्ग न. प. चा अग्निशमन बंबही तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. नगराध्यक्ष चेतन चव्हाणही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या आगीची तीव्रता इतकी होती, की घर पूर्णपणे बेचिराख झाले. साटेली-भेडशी तलाठी श्रीमती परब, मंडळ अधिकारी मंडळ राजन गवस, साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार घरात देवासमोर दिवा पेटत होता. त्यातच सिलिंडर लिक झाल्याने ही दुर्घटना घडली.
घर बेचिराख झालेले पाहून अंकिता अर्जुन नाईक यांना अश्रू अनावर होत होते. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले असून या दु:खातून सावरत असतानाच ही दुर्घटना घडली. मुलगा व शेजारील महिला त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. नवीन घर बांधण्यासाठी ठेवलेले रोख ऊपये पस्तीस हजार ऊपयेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरातील किमती वस्तू जळून खाक झाल्या.
सिलिंडरचा स्फोट झाला, त्यावेळी आगीचा लोळ घरापासून शंभर मीटरवर असलेल्या माडावर पोहोचून माडानेही पेट घेतला. सुदैवाने त्याचवेळी तेथे पोहोचलेल्या अग्निशामक बंबाच्या साह्याने ही आग विझविण्यात आली. त्यामुळे माडाखालील असलेला मांगर आगीपासून बचावला.
अंकिता नाईक यांना नवीन घर बांधायचे होते, त्यासाठी त्यांनी पै-पै करून पैसे जमा केले होते. सध्या त्या पत्र्याचे छप्पर असलेल्या घरात राहत होत्या. काही दिवसांनी त्या घर बांधणार होत्या. मात्र, घरासाठी ठेवलेली रोख रक्कम आगीत जळून खाक झाली तसेच घरातील किमती वस्तू व रोख रक्कम जळाल्याने आता घर कसे बांधणार, हा प्रश्न त्या अंकिता नाईक यांच्यासमोर उभा राहिला आहे.
अंकिता नाईक ह्या मुलगा, मुलीसह सदर घरात राहायचे. मंगळवारी मुलगा व आई काही कामानिमित्त शेजारच्या घरात गेल्या होत्या अन काही वेळाने ही घटना घडली.