घर विभागणी होणार सोपी
अर्जदारास 15 दिवसांत मिळणार प्रमाणपत्रे : वीज, नळ जोडणीसाठी ठरणार उपयुक्त,पंचायत संचालनालयाकडून परिपत्रक जारी
पणजी : राज्यातील अनेक कुटुंबांमध्ये घर विभागणीच्या अडचणी आहेत. या अडचणी संपुष्टात आणण्यासाठी तसेच कुटुंबामधील वाद कमी करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. घर विभागणीबाबतची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली असून, घर विभागणीनंतर त्या घरांना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशा स्वऊपात स्वतंत्र घरक्रमांक देण्याबरोबरच पाणी आणि विजेचीही सोडणी स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे. घर विभागणीचे अर्ज पंचायत खात्याकडे आल्यानंतर 15 दिवसांमध्ये विभागणी प्रमाणपत्रे दिली जातील, असे पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी सांगितले. घर विभाजित झाल्यानंतर स्वतंत्र घर क्रमांकासाठी पंचायतींकडे अर्ज येतात. परंतु, अनेक पंचायती पंचायत राज कायदा, 1994 मध्ये तशी तरतूद नसल्याचे कारण सांगून अशा अर्जांना मंजुरी देत नाहीत.
यापुढे मात्र पंचायतींना अर्जदारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता अशा अर्जांना मंजुरी देऊन त्यांना विभागणी प्रमाणपत्रे 15 दिवसांत देणे सक्तीचे राहील, असा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. सदस्यांची संख्या वाढल्यानंतर किंवा इतर कारणांमुळे अनेक कुटुंबे एकाच घरात स्वतंत्रपणे राहण्याचा मार्ग निवडतात. त्यानंतर त्यांच्याकडून स्वतंत्र घर क्रमांक तसेच पाणी आणि वीज जोडण्यांसाठी पंचायतींकडे अर्ज करण्यात येतात. परंतु अडचणीमुळे त्यांना स्वतंत्र गोष्टी प्राप्त होत नाहीत. परंतु आता अशा कुटुंबांना दिलासा देण्यासाठी अशा कुटुंबांकडून आवश्यक ती कागदपत्रे घेऊन त्यांना 15 दिवसांत विभागणी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभाजन घर क्रमांक देणे याचा अर्थ त्या व्यक्तीला मालकी हक्क प्रदान करणे असा होत नाही. हा केवळ आर्थिक प्रशासनिक सोपस्कार आहे, असेही हळर्णकर यांनी सांगितले.
घर विभागणीस आवश्यक कागदपत्रे
- विद्यमान घर क्रमांकाच्या घरपट्टीची प्रत.
- मूळ करदात्याचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या मृत्यूचा दाखला.
- अर्जदाराचा जन्म दाखला किंवा मूळ करदात्याशी नाते जोडणारे अन्य दस्तऐवज (बँक पासबुक, रेशन कार्ड)
- अर्जदाराकडून वापरात असलेल्या घराच्या भागाचा मापन केलेला आराखडा.
- घराचा एक चौदाचा उतारा.