कुद्रेमनी येथे भिंत कोसळून घराचे नुकसान
वार्ताहर/कुद्रेमनी
पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून जीवननगर, कुद्रेमनी गावातील सखुबाई गोपाळ पन्हाळकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. मंगळवारी मध्यरात्री ही अचानक घटना घडली. मायलेक दोघेजण या घरात राहतात. मोलमजुरी करून दैनंदिन चरीतार्थ ते चालवतात. भिंत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर या ठिकाणी रात्री गल्लीतील नागरिक जमा झाले. घरात झोपलेल्या जोतिबा पन्हाळकरला किरकोळ दुखापत झाली. भिंती कोसळून घरातील संसारोपयोगी साहित्य व धान्याचे नुकसान झाले आहे. बाजुला असलेल्या वाळूच्या ढिगावर माती मिसळून नुकसान झाले. कुद्रेमनी ग्रा.पं. अध्यक्ष विनायक पाटील, अरुण देवण, तलाठी साहाय्यक उज्ज्वला कांबळे, ग्रा. पं. अन्य सदस्यांनी घटनेची पाहणी करून कुटुंबाला धीर दिला. गरीब कुटुंबाला भरपाई देऊन साहाय्य करण्याची मागणी केली जात आहे.