मिरजेतील खंदकात खुदाईमुळे घर कोसळले
मिरज :
येथील भुईकोट किल्ल्याच्या खंदकातील जागेत अद्ययावत भाजीमंडईच्या कामासाठी चार वर्षांपूर्वी बेसुमार खुदाई केल्यानंतर खंदकालगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खंदकाच्या तटबंदीवरील माती बाहून गेल्याने घरांच्या भिंती निरसक्या झाल्या आहेत. बुधवारी रात्री शरद कुरणे यांच्या घराचा निम्मा भाग खंदकात कोसळला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. घराला धोका निर्माण झाल्याने कुरणे कुटुंबियांनी तातडीने घर सोडले आहे. खंदकातील भाजी मंडई कामासाठी खुदाई केल्यामुळे सामान्यांची घरे धोकादायक बनली असताना प्रशासनाने मात्र या कुटुंबियांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर न करता त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याचे दिसत आहे.
भुईकोट किल्ल्यात खंदकाच्या जागेत महापालिकेकडून सुमारे १३ कोटी रुपये खर्चुन भाजीमंडई उभारली जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून कासवगतीने इमारत बांधकाम सुरू आहे. प्रत्येकवेळच्या पावसाळ्यात खंदकाचा तलाब बनतो. त्यामुळे बारंबार काम रेंगाळते. मंडईकडे जाणाऱ्या रस्त्याचा अद्यापपर्यंत पत्ता नाही. खंदकातूनच रस्ता करावा लागणार असल्याचे सांगून महापालिकेने जेसीबी लावून खंदकात बेसुमार खुदाई केली. खंदकाच्या तटबंदीची जागा मोठ्या प्रमाणात खोदल्याने तटबंदीवर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.
मागील वर्षीही पावसाळ्यात घर कोसळले होते. अख्खे घरच कोसळल्याने दोन महिलांसह दोन चिमुकले ढिगाऱ्याखाली सापडले होते. त्यानंतर नागरिकांनी घरे सोडून स्थलांतर सुरु केले आहे. मात्र, अद्यापही काही गरीब कुटुंबे धोकादायक घरांमध्येच वास्तव्य करीत आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटींग सुरू आहे. खंदकाच्या जागेही मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. अशात खुदाई केलेल्या भागात पाणी मारुन तटबंदीची भिंत निसरडी झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पाऊस कोसळत असताना पावसाच्या पाण्यातून मातीही वाहून जात आहे. बुधवारी रात्रीही अशाच पध्दतीने शरद कुरणे याचेही घर कोसळले. सुदैवाने खंदकालगत असलेल्या भिंतीसह शौचालय जमीनदोस्त झाले. भिंतीलगत कोणीही झोपण्यास नव्हते. त्यामुळे अनर्थ घडला नाही. कुरणे कुटुंबियांनी गुरूवारी सकाळी घर रिकामे केले आहे.
खंदकातील भाजी मंडईसाठी झालेल्या खुदाईमुळे घरांना धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक व सामान्य नागरिक घरांमध्ये राहतात. अनेक धोकादायक बनलेली घरे कोसळण्याची भीती आहे. घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपले स्थलांतर करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाने आजतागायत त्यांच्या स्थलांतराच्या हालचाली अथवा उपाययोजना केल्या नाहीत.