आजपासून ‘गृहगणना’
आठव्या जनगणनेचा पहिला टप्पा : स्वेच्छा ऑनलाईन नोंदणीचीही सुविधा
पणजी : भारतीय 8 व्या जनगणनेचा गोव्यातील पहिला टप्पा आज बुधवार दि. 1 एप्रिलपासून सुरु होत असून त्यात गृहगणना करण्यात येणार आहे. दि. 1 ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत गणनेच्या पोर्टलवरुन स्वेच्छा ऑनलाईन गृहनोंदणी व इतर माहिती सादर करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यानंतर 16 एप्रिल ते 15 मे 2026 या काळात घरांना भेटी देऊन गृहगणना होणार आहे. जनगणना संचालिका चेष्टा यादव यांनी पर्वरी सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या गणनेची सविस्तर माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, प्रत्यक्ष जनगणना पुढील वर्षी 9 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात देशभर जनगणना करण्यात येणार असून त्यासाठी 422 सुपरवायझर व 2467 सर्वेक्षक मिळून आणि इतर कर्मचारी धरुन 3000 च्या आसपास लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात शिक्षकांचाही समावेश असून त्यात सर्वांना प्रत्येकी 25,000 मानधन मिळणार असल्याचे यादव यांनी नमूद केले.
एकूण 33 प्रश्नांची माहिती नोंदवणार
गृहगणना करताना घराशी संबंधित विविध प्रकारचे 33 प्रश्न विचारण्यात येणार असून त्यांचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे.
प्रथमच डिजिटल पद्धतीने गणना
यावेळी प्रथमच डिजिटल पद्धतीने गणना होणार असून ते काम करणारे कर्मचारी मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती संकलित करणार आहेत. त्यासाठी ते स्वत:चा मोबाईल वापरणार आहेत. त्या कामाची देखरेख पोर्टलवरुन करण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी मुख्य जनगणना अधिकारी
भारतीय स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना असून गोव्यातील तिन्ही जिह्यांचे जिल्हाधिकारी मुख्य जनगणना अधिकारी या नात्याने काम करणार आहेत. त्याशिवाय उपजिल्हाधिकारी व मामलेदारही साहाय्य करतील. या कामासाठी विशेष प्रशिक्षण देणारे नेमण्यात आले असून सरकारी धोरणे, मतदारसंघ विकास, आरक्षण व इतर महत्त्वाच्या कामासाठी जनगणना फायदेशीर ठरणार आहे.
अकरा आकडी मिळणार ‘आयडी नंबर’
स्वत: पोर्टलवरुन गृहनोंदणी केल्यास ती पूर्ण झाल्यानंतर 11 आकडी आयडी नंबर मिळणार आहे. तो नंबर प्रत्यक्ष गृहगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितल्यावर ते त्याची सत्यता पडताळून पाहणार आहेत आणि नंतर त्यास मान्यता देणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.
-जनगणना संचालिका,चेष्टा यादव
