घर एके घर...
माझे घर ते माझे घर
जगावेगळे असेल सुंदर
घर ही अशी गोष्ट आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला स्वत:चं घर नावाच्या कल्पनेने पछाडलेलं असतं. आता तर असं चलन आलेलं आहे, की माणसाला एक घर घेऊन तरी समाधान होतच नाही. एकापेक्षा जास्त घरं त्याला हवीहवीशी वाटतात. एकीकडे तो ज्या घरात जन्माला आला असेल ते मूळ घर त्याला खुणावत असतं. पोटापाण्यासाठी माणसं त्या घरातून दूर भराऱ्या घेतात. आणि मग तिथे राहायचं असतं म्हणून तिथे घर घ्यायच्या पाठी लागतात. मग तिथे घर घेण्यासाठी खटपट करणे, लोन वगैरे करणे आणि सगळ्या गोष्टींची अॅडजस्टमेंट करून घर घेणे हा एक मोठा अध्याय पार पडला की मग माणसाचं शहरात स्वत:चं घर होतं. पण तेवढं करून माणसाला समाधान होतं का? तर नाही. मग ज्या वेळेला शहरात भरारी घेतलेली माणसं स्वत:ची घरं बांधतात त्यानंतर हळूहळू मग त्यांना सेकंड होम हवंसं वाटतं. कारण आता बँकेत बऱ्यापैकी शून्यं जमलेली असतात.
या घराचे हप्ते फिटत यायला सुरुवात झालेली असते. उत्पन्न वाढत गेलेलं असतं. आणि मग असावं म्हणून, गुंतवणूक म्हणून दुसरं घर घेतात. मग हा ब्लॉक टू बीएचके असेल तर मग ते तिकडे वन बीएचके तरी असावं असा त्यांचा कटाक्ष असतो. याच्याही पुढे जाऊन लोक बंगले बांधतात, वाडे, हवेल्या, रो हाऊस घेतात. किती किती काय काय करतात. हे सगळं बांधून तरी माणसाचं समाधान व्हावं. पण तसं कधी होत नाही. मग माणसांना वेध लागतात ते ट्रेकिंगला जाण्याचे. मग ट्रेकिंगला असंच तर जाता येत नाही. सगळं साहित्य घेऊन जावं लागतं. मग फोल्डिंगचं घर घेऊन माणसं ट्रेकिंगला जातात. आणि तिथे जाऊन ती फोल्डिंगची घरं व्यवस्थित उभी करून त्याच्यात राहतात. काय गंमत आहे! माणसं एवढी दोन दोन तीन घरं बांधून सुद्धा सुट्टी घालवायला कुठे जाऊन राहतात तर त्या तात्पुरत्या उभ्या केलेल्या टेन्टमध्ये. म्हणजे कापडाच्या, किंतानाच्या नाहीतर प्लास्टिकच्या घरात. आपण यासाठी घर घेतो का? पण नाही मानवी स्वभावच विचित्र असतो.
माणसाची गंमत अशी असते की आधी ते घर बांधायचं, बांधण्यासाठी प्रचंड राबायचं आणि मग त्या घराचे हप्ते भरण्यासाठी धावत राहायचं. यात होतं काय, की जे घर इतक्या कष्टाने घेतलेलं असतं, त्या घराचा सहवास लाभणं दिवसेंदिवस दुर्मिळ होत जातं. आपण घरासाठी नाही घर आपल्यासाठी बांधलेलं आहे याचा माणसाला विसर पडतो की काय असं वाटतं. आणि मग
दिल ढूंढता है फिर वही
फुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुरे
जानां किये हुए
‘आंधी’ या पिक्चर मधले गाणं आहे. त्याच्यामध्ये नायक नायिकेला एक घरच नव्हे तर घरं मिळालेली असतात. घरच काय राजवाड्यात राहत असते ती. असं म्हणायला हरकत नाही. पण मग ती घरं, ती हवेली, ते राजवाडे मिळवण्यासाठी इतका आटापिटा झालेला असतो की आपल्याला त्यात राहायचं आहे हेच ते विसरून जातात. आणि मग त्यातली जी समजूतदार व्यक्ती आहे, जिला घरात राहण्याचं महत्त्व कळतं, ती एकटी फिरत असताना त्या पार्श्वभूमीवर हे गाणं वाजतं तेव्हा त्याचे रंग अधिक गहिरे होत जातात. ‘कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी’ याच्यामधलं ‘कशासाठी पोटासाठी’ करताना खंडाळ्याच्या घाटाची शोभा पाहायचं माणूस विसरून जातो. तसंच घर एके घर करणारी माणसं सुरुवातीला अहमहमिकेने घर सजवणारी माणसं पुढे पुढे त्या घराचे हप्ते भरण्यात इतकी गुंतून जातात की निवांतपणे त्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात टिकायलाही बिचाऱ्यांना वेळ मिळत नाही. म्हणजे घर घेण्यात समाधान नसतं का जरूर असतं. घर करणे ही एक अचीवमेंट नसते का? असते ना! नाही कोण म्हणेल? पण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मांजराने स्वत:चे शेपूट पकडत राहावी आणि मिळाली म्हणून उठायला जावं तोपर्यंत ती सुटलेली असावी असाच माणसाचा आणि घराचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो. माणसाचं स्वत:चं घर होणे हा त्याच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. त्यामुळेच की काय या नवीन घराला सजवताना त्याची पूजा करताना
दारा बांधता तोरण
घर नाचले नाचले
आज येणार अंगणी
सोनचाफ्याची पाऊले
असं म्हणून त्या घरात इष्ट देवतांचे स्वागत केले जाते. आपल्या घरात त्यांनी नेहमी रहावं अशी त्यांना विनंती केली जाते. माणूस प्रामाणिक असेल त्याला भल्याबुऱ्याची जाण असेल, शहाणपणा असेल, तर ते घराचं दार सदैव येणाऱ्याच्या स्वागतासाठी बाहू पसरून उभं राहतं. पण मोठे वाडे, हवेल्या यांच्यातून समृद्धीच्या वाऱ्यांपेक्षाही अहंकाराचा वारा जास्तच वाहताना जाणवतो. आणि या दुनियेत राहायला आलेला प्रत्येक माणूस हा कायमचा राहायला आलेला नसून शेवटी तो एक मुसाफिर आहे याचा घराच्या मालकांना विसर पडलेला दिसतो. कितीही वैभवात, श्रीमंतीत राहिलेला माणूस असेल तरी ज्या वेळेला त्याचा जीव निघून जातो त्या वेळेला त्याच्या देहाची राख किंवा मातीच होणार असते. वाड्यात, हवेलीत एखाद्या घराण्याच्या पिढ्यानपिढ्या नांदल्या याचा अर्थ त्या घरात तितक्या पिढ्यांना आपले शेवटचे श्वास मोजावे लागले असाही त्याचा अर्थ होतो. म्हणजेच
ना घर तेरा ना घर मेरा
दुनिया रैन बसेरा
याची जाणीव तेव्हा कधीतरी होत असावी. काही म्हणा. घर ही गोष्ट मोठी लोभाची आहे. म्हणून माणसाला पशुपक्ष्यांच्या घराची अपूर्वाई वाटते. तऱ्हेतऱ्हेची सुंदर घरटी बांधणाऱ्या पक्षांपासूनच माणूस बनवण्याची कला शिकला असेल असं वाटतं. आणि ती ओढ, ते आकर्षण निरंतर राहिलेलं आहे. कारण आजही घरासाठी माझं उबदार घरटं, असा शब्दप्रयोग केला जातो. स्वत:चं घर स्वत: बांधण्याइतके पक्षी प्रगल्भ असतात. माणसाला इतर अनेक माणसांची मदत घ्यावी लागते. पण पक्षांची एक जोडी आपलं संपूर्ण घर आपल्या स्वत:च्या जीवावर बांधते. आणि पिल्लांना स्वत:च्या जीवावर पोसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पिल्लांच्या पंखात एकदा का बळ आलं की स्वत:हून ते पिल्लांना घरट्याच्या बाहेर लोटूनही देते. पुन्हा नवीन सृजनासाठी सगळं काही विसरून आपल्या मनाची पाटी कोरी करते. ते घरटं मोडतं किंवा टाकून दिलं जातं पुन्हा शोध सुरू होतो नवीन घर बांधण्याचा! पुन्हा शोध सुरू होतो नवीन काहीतरी करण्याचा! मग पक्षी प्रगल्भ, की एका घरासाठी पिढ्यानपिढ्या झगडत राहणारा, भांडत राहणारा, त्या घराच्या वाटणीसाठी एकसारखे न्यायालयाचे उंबरे झिजवणारा माणूस शहाणा? होऊन जाणे या प्रश्नाचे उत्तरही तेव्हाच मिळेल जेव्हा आपण आपल्या घरात शांतपणे बसून विचार करू. जीव आटवून घर बांधतो आपण! एकदा त्या घराशी संवाद साधूया!
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु