गोमेवाडीत 17 लाखाची घरफोडी
आटपाडी :
गोमेवाडी (ता.आटपाडी) येथील सोने-चांदी व्यावसायिकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी 11 तोळे सोने, सव्वाचार किलो वजनाची चांदीची वीट, 350 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 100 साड्या असा ऐवज लंपास केला. बाजारभावाच्या दराप्रमाणे तब्बल 17 लाखाच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
गोमेवाडी-लक्ष्मीखडी येथील सदाशिव नारायण दबडे हे सोने-चांदीचे व्यापारी आहेत. त्यांचा इचलकरंजी (ता.हातकणंगले जि.कोल्हापुर) येथे व्यवसाय आहे. ते ठराविक दिवसांनी गावाकडे येत असतात. त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे लोखंडी बार कशानेतरी तोडून चोरट्यांनी घरातून मोठा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी उजेडात आली. चोरट्यांनी दबडे यांच्या घरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी 4 किलो 225 ग्रॅम वजनाची चांदीची वीट, 50 ग्रॅम वजनाचा चोख सोन्याचा तुकडा, 60 ग्रॅम वजनाचा सोन्याचा खडा, कानातील टॉप्स, 100 कॅरेटचे डायमंड पुष्कराज, मोती निलम लंपास केले.
225 ग्रॅम वजनाचा चांदीचा हार, 25 ग्रॅम वजनाचा चांदीचा कॉईन, 30 ग्रॅम वजनाची नोट आणि 100 साड्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने तिजोरीला असलेले लॉक कट केले आहेत. कपाट, बेडसह घरातील सर्व साहित्य उध्दवस्त करून चोरट्यांनी अंदाजे 17 लाखाचा ऐवज चोरून नेला.
याप्रकारामुळे चोरटे सराईत असून त्यांनी पूर्ण माहिती घेऊनच घरफोडी केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे येत आहे. घराचे मालक व्यवसायानिमित्त बाहेर असतात. आठ-दहा दिवसातून गावी येतात, याची माहिती घेवूनच हे कांड करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.