For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भवानीनगरात पाच लाखांची घरफोडी

10:44 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
भवानीनगरात पाच लाखांची घरफोडी
Advertisement

चांदीच्या दागिन्यांसह रोकड पळविली

Advertisement

बेळगाव : मंडोळी रोड, भवानीनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 5 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. रियल इस्टेट व्यावसायिक राजेश जाधव यांच्या घरी हा प्रकार घडला असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राजेश जाधव यांचा मुलगा रोहन जाधव यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला असून 1 जानेवारी रोजी दुपारी 2.15 वाजता हा प्रकार उघडकीस आला आहे. घरात कोणी नसताना चोरट्यांनी हा डाव साधला आहे.राजेश जाधव व त्यांचे कुटुंबीय गोव्याला गेले होते. मुलगा रोहन व त्यांचे अन्य दोघे नातेवाईक 29 डिसेंबर रोजी बेळगावला आले.

त्यावेळी त्यांचे कुटुंबीय गोव्यातच होते. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आपल्या घराला कुलूप लावून नववर्षाच्या स्वागतासाठी हे तरुण किल्ला तलावाजवळील एका हॉटेलला गेले होते. रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दुपारी शेजाऱ्यांचा फोन आला. तुमचा पाठीमागचा दरवाजा उघडा आहे, अशी माहिती देताच रोहन व त्यांच्या मित्रांनी घरी येऊन पाहिले असता घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. कुटुंबीय गोव्याहून दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी देव्हाऱ्यातील चांदीचा लक्ष्मीचा मुखवटा, बेडरुममध्ये पर्समध्ये ठेवलेली एक लाख रुपये रोख रक्कम, चांदीचा आरती सेट, समई, सरस्वतीची मूर्ती, तुळजा भवानीची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, गणेश मूर्ती असा 2 किलो 750 ग्रॅम चांदी, कपाटात ठेवलेले 30 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.