घाणंदमध्ये घरफोडी 15 तोळे सोने लंपास
आटपाडी :
आटपाडी तालुक्यातील घाणंद येथे ढगेवस्तीवरील सुशिला रामचंद्र ढगे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल 150 ग्रॅम सोने, 400 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 1 लाख 30 हजाराची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी उजेडात आली.
घाणंद(ढगेवस्ती) येथील सुशिला रामचंद्र ढगे यांचा मुंबई-मानखुर्दमध्ये ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. पतीच्या पश्चात त्यांनी हिमतीने मुलांसह व्यवसायाचा डोलारा सांभाळला. त्यांच्या कुटुंबात पंधरा दिवसापूर्वीच एक विवाहसोहळा झाला. त्यानिमित्ताने गावी आलेल्या सुशिला ढगे या आटपाडीत आल्या होत्या. ही संधी साधुन चोरट्यांनी रविवार 6 ते बुधवार 9 एप्रिल या कालावधीत घर फोडले.
चोरट्यांनी दोन गेटचे आणि घराचे कुलुप तोडुन प्रवेश केला. कपाटातील 20 ग्रॅमचे दोन ब्रेसलेट, 22 ग्रॅमचे मनी मंगळसूत्र, 50 ग्रॅमच्या बांगड्या, 30 ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, एक ग्रॅमचे सोन्याचे लहान बाळाचे डोले, चार ग्रॅमचे Eिरग, 22 ग्रॅमचे नेकलेस व रिंग, 400 ग्रॅमचे चांदीचे पैंजण आणि 1 लाख 30 हजार रूपये रोख असा मोठा ऐवज लंपास केला.
ही माहिती मिळताच विटा उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक विनय बहिर, सहायक निरीक्षक जाधव, उपनिरीक्षक थोरात यांनी घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली. चोरट्यांनी ढगे यांच्या घरातील सिसीटीव्हीचीही मोडतोड केली आहे. यावरून चोरट्यांनी पुर्ण माहिती घेवुनच डल्ला मारल्याचा कयास आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देवुन चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात करत आहेत.