बैलूर येथे घरफोडी; सात तोळे सोने लंपास
70 हजाराची रोकडही लांबविली : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एक चोरटा पोलिसांच्या ताब्यात
वार्ताहर/बैलूर
बैलूर ता. खानापूर येथील गावाबाहेरील पिंपळ वाड्यावर वास्तव्यास असणाऱ्या नामदेव तुकाराम कणपुंबकर यांच्या राहत्या घरात चोरट्यांनी चोरी करत सात तोळे सोने व रोख 70 हजाराची रक्कम लांबवली. कणकुंबकर कुटुंबीयांच्या व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका चोरट्यास पकडण्यात यश आले. मात्र दोघेजण सात तोळे सोने व रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत. नामदेव कणपुंबकर नेहमीप्रमाणे पत्नीसोबत राहत्या घराला कुलूप लावून जनावरांच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाणी आणण्यासाठी घरी आलेल्या त्यांच्या पत्नीस घराचा कुलूप तोडून चोर शिरल्याची जाणीव झाली. त्यांनी प्रसंगावधान राखत ग्रामस्थांना फोन करून बोलावले. चोरांना याची जाणीव होताच एकाने पळ काढला. त्याला पकडण्यासाठी ग्रामस्थ गेल्याची संधी साधत दोघे फरार झाले. ग्रामस्थांनी पकडलेल्या चोरास चांगलाच चोप देत खानापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. चोराजवळ मिळालेल्या ओळखपत्रानुसार त्याचे नाव चिदंबर सुतार असून तो तिवोलीचा रहिवासी आहे. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून चोरास ताब्यात घेतले.
बैलूर ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
येत्या मे महिन्यात बैलूर गावची महालक्ष्मी यात्रा होणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांची पैशांची जुळणी करत यात्रेसाठी लगबग सुरू आहे. हीच संधी साधण्याचा चोरटे प्रयत्न करतील, या शंकेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.