ओटवणेत भरदिवसा घर फोडून पाच तोळ्यांचे दागिने लंपास
ओटवणे । प्रतिनिधी
ओटवणे मांडवफातरवाडी येथे सोमवारी दुपारी दिवसाढवळ्या घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. अज्ञात चोरटा पळून जात असतानाच घराकडे दाखल झालेल्या महिलेने रोखण्याचा प्रयत्न केला परंतु चोरटा मोटार सायकलने प्रसार झाला. दरम्यान दिवसाढवळ्या भरवस्तीत घरातील महिलेच्या डोळ्यादेखत चोरीचा हा प्रकार घडल्यामुळे ओटवणे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ओटवणे मांडवफातरवाडी येथे रामचंद्र विष्णू वर्णेकर यांचे घर असून ते माजगावात कामाला गेले होते. तर त्यांची पत्नी रंजना वर्णेकर शेजारी गेल्या होत्या. याच दरम्यान घरात कोणी नसल्याची संधी साधत दुपारी १२:३० सुमारास मोटर सायकलने आलेला चोरटा या घरात घुसला. त्याने आतून कडी लावून घेतली. दुपारी १ च्या सुमारास रंजना वर्णेकर घरी परतल्या असता त्यांना घरासमोर एक पिवळी मोटारसायकल दिसली. संशय आल्याने त्यांनी घराकडे धाव घेतली असता घराचा दरवाजा आतून बंद होता. याचवेळी घरात कोणीतरी असल्याचे लक्षात येताच चोरट्याने मागच्या दाराने पळ काढला. यावेळी रंजना वर्णेकर यांनी या चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु चोरट्याने त्यांच्या डोळ्यादेखत मोटार सायकलने पसार झाला. यावेळी चोरट्याने घरातील कपाट फोडून सोन्याचे सुमारे ५ तोळे दागिने लंपास केले.ओटवणे पोलीस पाटील शेखर गावकर या चोरीची माहिती पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार मनोज राऊत तात्काळ दाखल झाले. त्यानंतर डॉग स्कॉडला देखील पाचारण करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे.