For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाताळ, नववर्षानिमित्त हॉटेल, प्रवास महागला

08:19 AM Dec 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
नाताळ  नववर्षानिमित्त हॉटेल  प्रवास महागला
Advertisement

राज्यातील हॉटेल हाऊसफुल्ल, विमानांचेही दर गगनाला भिडले

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

गोवा हे देशातील अतिशय देखणे राज्य असल्याने नववर्षाचे स्वागत असो वा तत्पूर्वी येणारा ख्रिसमस (नाताळ) सण असो. या दोन्ही क्षणांचा आनंद लुटण्यासाठी देशाच्या विविध राज्यांतून तसेच परराज्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्याचाच फायदा उठवत राज्यातील हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलातील खोल्यांचे दर भरमसाट म्हणजे अगदी दुपटीने वाढवले आहेत. याबाबत  आता पर्यटकांतूनच नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

Advertisement

गत आठ ते दहा दिवसांत हडफडे येथील बर्च नाईट क्लबला आग लागल्यानंतर  हॉटेल, क्लब, रिसॉर्ट यांची तपासणी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती. परंतु आता नाताळ सण अगदी तोंडावर आल्याने पर्यटक लोक हॉटेलांमध्ये आतापासूनच खोल्या बूक करीत आहेत. परंतु त्यासाठी त्यांना भरमसाट पैसे मोजावे लागत आहेत. राज्यातील बहुतांश हॉटेलांचे दर प्रत्येक खोल्यांसाठी 4 ते 5 हजार ऊपयांच्या घरात गेलेले आहेत. राजधानी पणजीत तर त्याहून अधिक दर वाढलेले असल्याचे खुद्द व्यावसायिकांनीच कबूल केले.

गोव्यात येण्यासाठी वातानुकूलित खासगी बसेस (ट्रॅव्हल्स) यांनीही पर्यटन हंगामाचा फायदा उठवत अव्वाच्या सव्वा दर वाढवलेले आहेत. गोवा ते मुंबई जाण्यासाठी किंवा मुंबई ते गोवा या मार्गासाठी 1200 ते 1500 ऊपये दर आकारला जात होता. परंतु आता यंदा नाताळ आणि नववर्षामुळे 2500 ऊपयांपर्यंत प्रति व्यक्ती असा दर आकारला जात आहे. या दर आकारणीवर नियंत्रण नसल्याने प्रत्येक ट्रॅव्हल्स कंपनीचे दर हे वेगवेगळे आहेत. परंतु ते चढेच आहेत. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या प्रवाशांची लूट आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

ब्ला-ब्ला, ओला रिबेलो यांसारख्या खासगी टॅक्सी वाहनांनीही प्रवास दर वाढवल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. काही खासगी टॅक्सी वाहनातून प्रवाशांची ने-आण होत असून, हे टॅक्सी चालक एखादा व्यक्ती ब्ला-ब्ला, ओला रिबेलोसारख्या अॅपवर नोंद करतात. उरलेले सीट (प्रवासी) हे खासगी पद्धतीने वाहनात घेऊन त्यांच्याकडून मोठी दरआकारणी करत आहेत. या प्रकारामुळे जे वाहतूक खात्याकडे नोंद असलेले स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना भाडे मिळणे मुष्कील बनले आहे. त्यामुळे अशा खासगी भाडी मारणाऱ्या वाहनांची तपासणी होणे गरजेचे आहे.

विमानांचे दर गगनाला

विमानातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्येही मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याला येताना विमानाचा प्रवास करायचा झाल्यास आज विमानाचे तिकीट किमान साडेसहा हजार ऊपये प्रती व्यक्ती असे झाले आहे. 25 डिसेंबर तारखेपर्यंत विमान तिकीट ऑनलाईन बूक करायचे झाल्यास 6219 ऊपये ते 8566 इतका दर इंडिगो विमानाचा झाल्याचे दिसत आहे. तर हाच दर एअर इंडिया विमानाचा दर त्याहून अधिक आहे. या विमान कंपनीचे प्रती व्यक्ती तिकीट हे 7 ते 12 हजारापर्यंत गेल्याचे दिसत आहे. 31 डिसेंबरपर्यंत विमान प्रवासासाठी तिकीट बूक करणाऱ्यांना किमान दहा हजारांहून अधिक रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे.

दर आकारणीवर रहावा अंकुश

गोवा हे पर्यटनीय स्थळ असल्याने या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. परंतु हॉटेल, प्रवास यांचे दर निश्चित नसल्याने किंवा त्यावर कुणाचाच अंकुश नसल्याने दर वाढवले जात आहेत. त्यासाठी गोवा सरकारने यात लक्ष घालून हॉटेल व प्रवास दर निश्चितीसाठी प्रयत्न करावेत, अशी प्रवासी व पर्यटकांची मागणी आहे.

Advertisement
Tags :

.