हॉटेल साहित्य चोरट्यांना अटक
देशमुखनगर :
हॉटेलच्या किचनमधील स्टीलचे साहित्य चोरणारे 3 चोरटे तसेच गुह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी जप्त केला आहे. शंकर जयवंत शिंदे (वय 23, रा. सोनगाव निंब, ता. जि. सातारा), राज सतीश दणाणे (वय 21, रा. वनवासवाडी ता. जि. सातारा) व प्रज्वल वसंत जाधव (वय 21, रा. संभाजीनगर, गोडोली, ता. जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी घरफोडी, चोरी असे गुन्हे उघडकीस आणून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करुन गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना कारवाईबाबतच्या सूचना दिल्या होत्या.
अतीत (ता. जि. सातारा) येथील माजगाव फाटा येथील न्यू हॉटेल सिमरनजित नावाच्या नवीन हॉटेलचे फर्निचरचे काम काम सुरु असताना हॉटेलचे किचनमधील स्टीलचे किचन फूड काउंटर टेबल, सर्व्हिस टेबल बर्नर, भट्ट्या, मसाला काउंटर टेबल असे 1 लाख 68 हजार किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबतचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दि. 26 रोजी दाखल करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना सदर गुन्हा उघडकीस आणून गुह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच चोरट्यांचा शोध घेवून कारवाईबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डी.बी. पथकाचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण व पो. कॉ. अतुल कणसे यांना गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की, एक चार चाकी वाहन संशयितरित्या हॉटेलच्या आवारत वावरताना दिसले होते. त्यावरुन डी.बी. पथकाने सदर वाहनाचा शोध घेवून चालकास ताब्यात घेतले. तसेच मी व माझ्या दोन मित्रांनी मिळून सदर गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर त्या तिघांना ताब्यात घेत चोरीस गेलेला मुद्देमाल, गुह्यात वापरलेले एक चारचाकी मारुती सुझुकी कंपनीचे कॅरी वाहन असा एकूण आठ लाख अठरा हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या सूचनेप्रमाणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रशांत चव्हाण, अतुल कणसे, प्रविण शिंदे, सतीश पवार, संजय जाधव यांनी सदर कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक कारळे तपास करित आहेत.